दिग्रस : शिवसेनेच्या संजय राठोड यांच्या नजरेने विरोधक घायाळ (व्हिडिओ)

File photo
File photo

यवतमाळ : राज्याचे महसूल राज्यमंत्री व सेनेचे दिग्रस विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार संजय राठोड यांचा छत्रपती उदयनराजे भोसले व श्रीनिवास पाटील यांच्या स्टाईलमधील विरोधकांना "दम' भरतानाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या अनोख्या नृत्याच्या स्टाईलमुळे संजय राठोड यांची राज्यभरात हवा झाली आहे.
चित्रपटांतील हिरो आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनय, वेगवेगळ्या लकबी व संवादफेकीसाठी प्रसिद्ध असतात. त्यात सुपरस्टार राजेश खन्ना, अँग्री यंगमॅन अमिताभ, देवानंद, राजकुमार, नाना पाटेकर यांनी आपली वेगळी छाप सोडली आहे. तर अलीकडील शाहरुख खान, आमीर खान, सलमान खान ते सिंगम अक्षय देवगण आपल्या खास स्टाईलसाठी ओळखले जातात. आतापर्यंत राजकीय नेते त्यांचे स्वभाव, नेतृत्वगुण व त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण भाषणशैलीसाठी ओळखले जात. त्यांचे छंद ही त्यांची वेगळी ओळख असायची. नव्या महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, जाणता राजा शरद पवार आदी आपल्यातील नेतृत्वगुण, कणखरपणा, भाषण व विविध छंदांसाठी प्रसिद्ध आहेत. म्हणून लोकांनी त्या प्रत्येक नावाच्या पुढे वेगळे असे "बिरुद' लावले आहेत.

"हिंदूहृदयसम्राट', 'जाणता राजा' या कुण्या विद्यापीठाने नव्हे तर लोकांनी बहाल केलेला पदव्या (सन्मान) आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या वैशिष्ट्यपूर्ण "फोटोग्राफी'साठी, तर मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे आपल्या व्यंगचित्रांसाठी प्रसिद्ध आहेत. हे सर्व नेते नवीन नेत्यांसाठी आदर्शस्थानी आहेत. जनसामान्यांचे कणखर नेतृत्व म्हणून संजय राठोड यांची यवतमाळ जिल्ह्यासह विदर्भात ख्याती आहे. राज्याचे महसूल राज्यमंत्री म्हणून त्यांना समग्र महाराष्ट्र ओळखतो.

कालपरवा महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक झाली. त्यात ते दिग्रस विधानसभा मतदारसंघातून 63,607 मतांनी विजयी झाले. या मतदारसंघातून ते चौथ्यांदा विधिमंडळात पोहोचले आहेत. गेल्या 15 वर्षांत मतदारसंघाचा विकास त्यांनी केला आहे. यावेळी त्यांना निवडणुकीला सामोरे जाताना अपप्रचारालाही सामोरे जावे लागले. त्यामुळे "कस'लागला. मताधिक्‍य कमी झाले. मात्र, जनतेचे प्रेम आटले नाही. त्यांची दिग्रस शहरातून विजयी मिरवणूक निघाली.

विरोधकांच्या एका कार्यकर्त्याने हातवारे करताच संजय राठोड यांचा संयम सुटला. मिरवणुकीत वाहनाच्या टफावरच उभे राहून त्यांनी नृत्य व अभिनयाच्या माध्यमातून सर्व जनतेसमोर त्या कार्यकर्त्याला उत्तर दिले. त्यांनी "त्या' कार्यकर्त्यांच्या दिशेने रोखलेली नजर एका भिडस्त योद्धयाची वाटत होती. तर मुक्का दाखवीत, छाती ठोकत, कॉलर उडवित दंड थोपटत इशाऱ्यांनी एक संदेश दिला जात होता. शेवटी गाडीत बसतानाही त्यांनी मिश्‍यांवर ताव देत विरोधकांना आव्हानच दिले. यावेळी त्यांच्या पी.ए.नेदेखील त्यांच्याप्रमाणेच छाती ठोकून प्रत्युत्तर दिले. मिरवणुकीत सहभागी हजारो दिग्रसकरांनी हा क्षण डोळ्यांत साठवून ठेवला. कधी नव्हे असे रूप त्यांनी आपल्या लाडक्‍या नेत्यांचे बघितले होते. निवडणुकीच्या काळात पसरवलेल्या अफवा आणि झालेल्या मन:स्तापाला त्यांनी या माध्यमातून वाट मोकळी करून दिली होती. "झाले गेले विसरणाऱ्यांपैकी मी नाही, आठवण ठेवा गाठ माझ्याशीच आहे,' असे तर त्यांना विरोधकांना सांगायचे नव्हते, अशी चर्चा दिग्रसकर करीत आहेत. मात्र, त्यांचा हा व्हिडिओ व्हायरला झाला आणि लाखो नेटकऱ्यांनी बघितला. तामीळ चित्रपटातील एखाद्या हिरोला मिळावी एवढी दाद त्यांनी या व्हिडिओला दिली आहे.

...त्या नजरेने अनेकांच्या काळजात धस्स
संजय राठोड हे जनतेचे आवडते नेते आहेत. सर्वसामान्य माणसांना ते आपलेसे वाटतात. त्यांची आरोग्य सेवा व लोकांना मदत करण्याची धडपड सर्वविदीत आहे. शिवसेना कार्यकर्ते, एक आंदोलक, नेते आणि आता मंत्री म्हणून त्यांच्याविषयी जनतेला आदर आहे. कालच्या व्हिडिओत त्यांनी लालबुंद झालेल्या डोळ्यांतून विरोधकांवर रोखलेली नजर पाहून विरोधकांच्या काळजातही धस्स झाले आहे. आता, या नजरेचा सामना करण्याची वेळ तर आपल्यावर येणार नाही ना, अशी धास्ती त्यांच्यात निर्माण झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com