भोगी'चा विडा...तीळगुळाची पोळी अन्‌ संक्रांतीचे वाण !

दिनकर गुल्हाने
Tuesday, 14 January 2020

मकर संक्रांतीच्या आधी भोगी. भोगीला विडा तर मकर संक्रांतीला पुरणपोळीचा मान. हे दोन्ही शेतकरी कुटुंबांतील महिलांचे आवडते सण. ग्रामीण तसेच शहरी भागातही या सणांमध्ये महिलांचा मोठा सहभाग दिसून येतो. कृतज्ञतेच्या या सोहळ्याला चैतन्याची किनार लाभली आहे.

पुसद (जि. यवतमाळ ) : शेतीत पीक भरभरून आले की शेतकरी राजा खुश होतो आणि इंद्र देवाला प्रसन्न करण्यासाठी त्याची अर्धांगिनी शेतातील तेरा भाज्यांचा 'भोग' लावते. सोबत तिळगुळाच्या पोळीचा नैवेद्य दाखवल्यानंतर सात सुवासिनींना विडा दिला जातो. शेती संस्कृतीशी निगडित हा 'भोगी' सण मकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येला मंगळवार ता.14 रोजी शेतकरी कुटुंबात मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला.

मकर संक्रांतीच्या आधी भोगी. भोगीला विडा तर मकर संक्रांतीला पुरणपोळीचा मान. हे दोन्ही शेतकरी कुटुंबांतील महिलांचे आवडते सण. ग्रामीण तसेच शहरी भागातही या सणांमध्ये महिलांचा मोठा सहभाग दिसून येतो. कृतज्ञतेच्या या सोहळ्याला चैतन्याची किनार लाभली आहे.
चिद्दरवार कुटुंबातील अर्चना जयंत चिद्दरवार यांनी सकाळी भोगी पूजा मांडली. त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी शेतातील 13 प्रकारच्या भाज्या एकत्रित करून भोग तयार केला. सोबतीला तीळ गुळाची पोळी, वरण, भात, कढी असा नैवेद्य देवघरातील गौरीपुढे ठेवला.

सायंकाळी हिरव्या पानाफुलांनी चौरंग सजवून हळदीची तसेच देवघरातील गौरीची स्थापना केली जाते. चौरंगा समोर सुंदर रांगोळी, गौरीच्या मागे आरसा व पुढ्यात नंदादीप असा पूजेचा मान तर गौरीपूजेनंतर सुवासिनींना सात विडे दान करताना तीळवा दाखविण्यात येतो. गौरीला हळदीकुंकू हलवा व धाग्याचे पोवते वाहतात. या गौरी सजावटीमध्ये घरधनीन तसेच सुवासिनींचे लावण्य फुलून येते, हे वेगळे सांगावयास नको.

Image may contain: 3 people, people smiling, people sitting

बुधवार ता.15 रोजी मकर संक्रांत. हिवाळ्यातील हुडहुडी भरणारा गारठा तिळातिळाने संपवणारा मकर संक्रांतीचा सण महिलांना आनंदित करीत आहे. लग्न झालेल्या लेकी संक्रांतीला घरी खुशाली घेऊन येतात आणि आनंदाला भरते येते. मकर संक्रांतीला पुरणपोळीच्या नैवद्याचा मान असतो. यंदाची मकरसंक्रांत पंचमीला येत असल्याने नागपंचमीचे वाण सुवासिनींना अर्पण करण्यात येते. अलीकडे मकर संक्रांत निमित्त हळदी कुंकू एकत्रित करण्यावर भर दिला जातो. यातून सामाजिक व भावनिक बंध जोपासल्या जातात.

संक्रांतीचे वाण अन्‌ उखाणा !
साजशृंगार केलेल्या सुवासिनी मकर संक्रांतीला हळद कुंकू आणि वाण देऊन एकमेकींना शुभेच्छा देतात. यावेळी आग्रह पूर्वक उखाणा घेतल्या जातो. या उखाण्याला कधी भावूक तर कधी गमतीची किनार असते. एकमेकींच्या भावनांचा आदर असतो. पुसद येथील चिद्दरवार परिवारात अर्चना, विजया, प्रभा,वंदना, साक्षी, ऋचा, सोनाली, देवी, वीणा अशा साऱ्या सुवासिनी एकत्रित आल्या की उखाण्यांनी हास्याचे फवारे उठतात. अर्चना चिद्दरवार यांनी तत्काळ तयार केलेला हा उखाणा खूप काही सांगून जातो.
" भोगीचा विडा, तीळ गुळाची पोळी
संक्रांतीचे वाण, पुरणपोळीचा मान
असा गौरीचा साज...
खास 'सकाळ'साठी आज "  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sankrant festival going on every where with lots of fun