‘गॅंगस्टर’ आंबेकर शरण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

नागपूर - बहुचर्चित बाल्या गावंडे हत्याकांडातील मुख्य आरोपी आणि कुख्यात ‘डॉन’ संतोष आंबेकर गुरुवारी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे शरण आला. गेल्या वर्षभरापासून तो नागपूर पोलिसांच्या हातावर तुरी देत फरार होता. तो न्यायालयात शरण आल्याने नागपूर पोलिसांची नाचक्‍की झाली आहे. त्याची रवानगी मध्यवर्ती कारागृहात केली असून कळमना पोलिसांना त्याची कोठडी घेण्याची मुभा दिली आहे.  पान ६ वर  
‘गॅंगस्टर’ आंबेकर शरण

नागपूर - बहुचर्चित बाल्या गावंडे हत्याकांडातील मुख्य आरोपी आणि कुख्यात ‘डॉन’ संतोष आंबेकर गुरुवारी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे शरण आला. गेल्या वर्षभरापासून तो नागपूर पोलिसांच्या हातावर तुरी देत फरार होता. तो न्यायालयात शरण आल्याने नागपूर पोलिसांची नाचक्‍की झाली आहे. त्याची रवानगी मध्यवर्ती कारागृहात केली असून कळमना पोलिसांना त्याची कोठडी घेण्याची मुभा दिली आहे.  पान ६ वर  
‘गॅंगस्टर’ आंबेकर शरण

नागपूर शहरातील गुन्हेगारी जगतात कुख्यात संतोष आंबेकर आणि बाल्या गावंडे यांच्यात गॅंगवार सुरू होते. दोघेही एकमेकांवर कुरघोडी करीत वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत होते. बाल्या गावंडेचे प्रस्थ वाढल्याने त्याने आंबेकरचा ‘गेम’ करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे गॅंगस्टर आंबेकर याच्या गोटात खळबळ उडाली होती. बाल्याच्या भीतीपोटी आंबेकर शहरातून फरार झाला होता. बाल्या केव्हाही गेम करणार याची खात्री आंबेकरला झाली होती. 

गेल्या २२ जानेवारी २०१७ रोजी आंबेकरने बाल्याच्या हत्येची सुपारी योगेश कुंभारेला दिली. योगेशने शुभम व अन्य साथीदारांच्या मदतीने बाल्या गावंडे याच्या हत्येचा कट रचला. योगेशने बाल्याला २२ जानेवारीला कार्यक्रमासाठी कळमन्यातील तुकारामनगर येथील घरी बोलावले. दोघांनी दारू ढोसली.

यादरम्यान वाद उकरून काढून योगेश व त्याच्या साथीदाराने बाल्याची  निर्घृण हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह झुडपी जंगलात फेकून पळ काढला. या प्रकरणात कळमना पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून नऊ जणांना अटक केली. १० मे रोजी कळमना पोलिसांनी दोषारोपपत्र सादर केले. त्यात संतोष आंबेकर याचेही नाव होते. हत्याकांडानंतर मात्र संतोष पसार झाला. तेव्हापासून तो फरार होता. न्यायालयानेही फरार घोषित करून संतोषविरुद्ध अटक वॉरंट जारी केला होता. 

या प्रकरणातील इतर आठ आरोपींची १२ डिसेंबरला सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. त्यानंतर आंबेकर हा न्यायालयाला शरण येईल, अशी माहिती होती. आज गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता तो प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ओ. जैन यांच्या न्यायालयात शरण आला. त्यानंतर न्यायालयाने कळमना पोलिसांना बोलावले. कळमना पोलिसांनी पोलिस कोठडीची मागणी केली. मात्र, न्यायालयाने आंबेकरची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.

मुन्ना यादवची चर्चा
डॉन आंबेकर न्यायालयात शरण आल्यानंतर शहरातील राजकारण्यांच्या व्हॉट्‌सॲप ग्रुपवर मुन्ना यादव लवकरच शरण येईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. तसे ‘मॅसेज’ दिवसभर फिरत होते. आंबेकरच्या निमित्ताने मुन्ना यादवची आज पोलिस आणि राजकीय वर्तुळात चर्चा होती. नागपूर पोलिसांच्या नाकावर टिच्चून डॉन शहरात फिरत होता. तो शरण येईपर्यंत पोलिसांना त्याच्या हालचालींची माहिती न मिळाल्याने पोलिस यंत्रणेचे अपयश स्पष्ट दिसत होते.

Web Title: santosh ambekar surrender crime