संतोष काळवेच्या फाशीचा निर्णय राखून ठेवला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

नागपूर : चिमुकल्याचे अपहरण व खून प्रकरणातील आरोपी संतोष अरविंद काळवे (26) याच्या फाशीच्या शिक्षेचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राखून ठेवला आहे. आठ ते दहा दिवसांमध्ये या प्रकरणी निकाल जाहीर करण्यात येईल. आरोपीच्या मोबाईलबाबत आणि सीमकार्डबाबत असणाऱ्या शंका दोनही पक्षांच्या वकिलांना विचारल्यानंतर उच्च न्यायालयाने हा निर्वाळा केला. प्रकरणावर न्यायमूर्ती सुनील शुक्रे व श्रीराम मोडक यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
अकरावर्षीय चिमुकला साहिल ऊर्फ यश नितीन बोरकर याचे अपहरण व खून केल्याच्या आरोपात सत्र न्यायालयाने संतोष काळवेला फाशीची शिक्षा सुनावली आहे. तो खापरी येथे भाड्याच्या खोलीत राहत होता. पीडित बोरकर कुटुंबही खापरीतच राहते. आरोपीची बोरकर कुटुंबाशी व यशसोबत चांगली ओळख होती. त्याने याचाच गैरफायदा घेऊन यशचा विश्वासघात केला. यश परिसरात मित्रांसोबत खेळत असताना आरोपी मोटारसायकलने तेथे गेला व त्याने यशला चिप्स व कोल्ड्रिंकचे आमिष दाखवून सोबत चलण्यास सांगितले. त्यानंतर आरोपीने यशला मिहान उड्डाणपुलाच्या खाली नेले व तेथे त्याचा कॉंक्रिटच्या दगडाने ठेचून खून केला, असे सरकार पक्षाचे म्हणणे आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाने आज (ता. 14) आरोपीच्या मोबाईलबाबत आणि सिमकार्डबाबत असणाऱ्या शंका दोनही पक्षांच्या वकिलाना विचारल्या आणि आठ ते दहा दिवसांसाठी निकाल राखून ठेवला. सत्र न्यायालयाची शिक्षा कायम ठेवण्यासाठी राज्य सरकारने उच्च न्यायालयासमक्ष प्रकरण सादर केले आहे. तसेच, आरोपीने या शिक्षेविरुद्ध अपील दाखल केले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Santosh's death sentence Decision retained