सासरची आई : एकमेकींच्या सहकार्यातून घराला घरपण 

file photo
file photo

 नागपूर  : कुटुंबातील सासू-सुनेच्या नात्यात प्रसन्नता असेल तर, घरही प्रसन्न आणि आनंदी राहते. परंतु, याउलट ज्या घरात सासू-सुनेच्या नात्यात कलह असेल तर घरातही कलहाचे वातावरण असते. नागपूर येथील सोनल सुरेंद्र पांडे आणि निर्मला महादेवप्रसाद पांडे या दोघींच्या नात्याला 23 वर्षे पूर्ण झाली. गेल्या तेवीस वर्षात या नात्यातील सहकार्यातूनच घरात प्रसन्नता असल्याचे सोनल यांनी सांगितले. 

तेवीस वर्षांपूर्वी आंतरजातीय विवाहाचा धाडसी निर्णय घेणाऱ्या सोनल यांनी खामला येथील पांडे कुटुंबात लहान सून म्हणून प्रवेश केला. कुटुंबातील सदस्यांशी ओळख असल्याने आणि मुलगा चांगला असल्याने लग्नाला विरोध झाला नाही. बरेचदा आंतरजातीय सून घरात आल्यानंतर सुरुवातीपासूनच सासूच्या मनात सुनेबाबत अढी निर्माण होते. अजूनही अशी बरीच प्रकरणे आजूबाजूला दिसतात. मात्र, पांडे कुटुंबातील सासूबाई निर्मला यांच्या नावाप्रमाणेच निर्मळ मन असल्याने, त्यांनी अतिशय मायेने लहान सुनेचा स्वीकार केला. 

नुसता स्वीकारच केला नाही तर, तिच्या प्रत्येक कार्यात त्यांनी तिला वेळोवेळी सहकार्य केले. सोनल यांचे पदव्युत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले असून, त्या खासगी व्यवसाय करतात. या व्यवसायामुळे लग्नानंतर अनेक वर्ष त्या सतत कामात रहायच्या. पतीही व्यावसायिक असल्याने त्यांचाही व्याप मोठा होता. अशा परिस्थितीत निर्मला यांनी आई म्हणून दोघांनाही सारखेच सांभाळून घेतले. दोघांच्या कामाच्या वेळा आणि त्यांचे आरोग्य या सर्वांवर त्यांनी जातीने लक्ष दिले. आईंनी मला प्रत्येक गोष्टीत न बोलताही साथ दिली. अनेकदा त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टीही खूप मोठे समाधान देऊन जातात. 

स्वयंपाक शिकविण्यापासून ते बाहेर काम करताना जवळ बाळगावा लागणारा आत्मविश्‍वास या सर्व गोष्टी आईंकडून शिकल्याचे सोनल सांगतात. आईंबाबत दोन ओळीस सांगायचे झाले तर.. घराला येते प्रसन्नता तुझ्या स्पर्शाने.. आयुष्याला आहे अर्थ तुझ्या अस्तित्वाने, तुझा प्रत्येक शब्द जणू अमृताचा, प्रत्येक क्षणी आधार मायेच्या पदराचा. 

...तर घरातही प्रसन्न वातावरण
सासू सुनेच्या नात्यात एकमेकींना सहकार्य करण्याची भावना कायम राखली गेली तर, घरातही प्रसन्न वातावरण राहते. आईंनी मला प्रत्येकवेळी सहकार्य केले. आता वय वाढल्यामुळे त्यांना माझ्याकडून सहकार्याची अपेक्षा असते ती माझी जबाबदारीच असून, मी ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करते. 
- सोनल सुरेंद्र पांडे, सून. 
------------ 
सोनलचा स्वभाव मनमिळावू
सोनलचा स्वभाव मनमिळावू असल्याने तिला आमच्या कुटुंबात सामावून घेण्यात अडचण आली नाही. आता इतक्‍या वर्षांनंतर नात्यात घट्टपणा आणि आपलेपणा निर्माण झाला आहे. सासू सुनेच्या प्रसन्न नात्यावरच घरातील वातावरणही प्रसन्न राहते. 
- निर्मला महादेवप्रसाद पांडे, सासू. 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com