मृत्यूला कवटाळताना सतीशने वाचवले तिघांचे प्राण

Satish-Bopache
Satish-Bopache

नागपूर - मृत्यूला कवटाळताना सत्तावीस वर्षीय तरुणाने यकृतासह दोन्ही किडनी दानातून तीन जणांना रविवारी जीवनदान दिले आहे. नागपूरच्या न्यू इरा रुग्णालयात २ डिंसेबरला  एकाचवेळी यकृत आणि किडनीदानाचे प्रत्यारोपण झाले. सतीश नारद बोपचे असे अवयवदानकर्त्या युवकाचे नाव आहे. सतीशच्या यकृत दानातून नागपूरच्या २९ वर्षीय युवकाला जीवनदान मिळाले. तर किडनीदानातून दोघांचा जीव वाचला. 

नागपूर-भंडारा महामार्गावरील अपघातात २७ नोव्हेंबरला सतीश गंभीर जखमी झाला.  अपघातग्रस्त सतीशला न्यू इरात भरती करण्यात आले. सतीशवर उपचार सुरू झाले. न्यू इरातील डॉक्‍टरांनी सतीशचा जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. डोक्‍याला गंभीर दुखापत झाली होती. मेंदूवर आघात झाला होता. दोन दिवसांनंतर उपचाराला दाद मिळत नसल्याचे डॉक्‍टरांच्या लक्षात आले. तशी माहिती नातेवाइकांना देण्यात आली. सतीश ‘ब्रेनडेड’ झाल्याचे कळताच कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.

न्यू इरा रुग्णालय प्रशासनाने ब्रेनडेड झाल्याची माहिती विभागीय अवयवदान प्रत्यारोपण समितीच्या अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी, सचिव डॉ. रवी वानखेडे यांच्यासह यकृत प्रत्यारोपण समितीचे डॉ. सुधीर टॉमी, किडनी समितीचे डॉ. सी. पी. बावनकुळे आणि नागपूर झोन कोऑर्डिनेटर वीणा वाठोरे यांना दिली. समितीच्या मध्यस्थीने सतीशचे वडील नारद बोपचे आणि काका हेमराज रहांगडाले यांचे अवयवदानासाठी समुपदेशन करण्यात आले. तरुण मुलाचे अस्तित्व कायम राहावे या हेतूने वडिलांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाने तीन जणांना जीवनदान मिळाले. 

आतापर्यंत उपराजधानीतील विभागीय अवयवदान समितीच्या पुढाकारातून ४० जणांचे अवयवदान झाले असून, देशाच्या कानाकोपऱ्यातील किडनी निकामी झालेल्यांना ७२ किडनी दान करण्यात आले. तर २७ यकृत उपलब् करून दिले आहेत. त्यापैकी १३ यकृत प्रत्यारोपण शहरात झाले. 

यकृत आणि एक किडनीचे न्यू इरा हॉस्पिटलमध्ये तर सतीशच्या दुसरी किडनी वोक्‍हार्ट हॉस्पिटलमध्ये एका गरजू रुग्णावर प्रत्यारोपण करण्यात आले. 

न्यू इरात दुहेरी प्रत्यारोपण
लकडगंज येथील न्यू ईरा हॉस्पिटलमध्ये सतीशचे यकृत आणि किडनीचे एकाचवेळी प्रत्यारोपण करण्यात आले. ही दुहेरी प्रत्यारोपणाची ही दुसरी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. या हॉस्पिटलमधील हे १२ वे यकृत तर ३ रे किडनी प्रत्यारोपण आहे. येथील प्रसिद्ध यकृत प्रत्यारोपणतज्ज्ञ डॉ. राहुल सक्‍सेना यांच्यासह डॉ. वरुण महाबळेश्‍वर, डॉ. राजीव सिन्हा यांनी यकृत प्रत्यारोपण केले. तर डॉ. अमित देशपांडे, डॉ. रवी देशमुख, डॉ. एस. जे. आचार्य, डॉ. रोहित गुप्ता, डॉ. अनिल सिंग, डॉ. शीतल बंसल यांनी किडनी प्रत्यारोपण केले. प्रत्यारोपण समन्वयक डॉ. अश्‍विनी चौधरी, डॉ. अमित मदान यांच्या मदताने दुहेरी प्रत्यारोपण यशस्वी झाले, असे न्यू इराचे संचालक डॉ. आनंद संचेती यांनी सांगितले.

सतीशला डॉक्‍टरांनी वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, डोक्‍याला गंभीर दुखापतीमुळे  मेंदूच्या पेशींची मोठी हानी झाली. नातेवाइकांनी आपल्या तरुण मुलाचे अवयवदान करण्याचा सामाजिक बांधीलकीतून मोठा निर्णय घेतला. त्यांचे आभार. सतीशचे यकृत आणि दोन्ही किडनीदानातून तिघांना पुनर्जन्म मिळाला. तसेच विभागीय अवयवदान समितीच्या डॉ. दाणी आणि वानखेडे यांचे मोलाचे योगदान अवयवदान चळवळीला मिळत आहे. 
- डॉ. आनंद संचेती, हृदयरोगतज्ज्ञ, न्यू इरा हॉस्पिटल, नागपूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com