अखेर सावनेरकरांची "मर्कटलिलां'पासून सुटका

सावनेर ः मंकी टॅपिंग टिमने पिंजराबंद केलेली माकडे व जमलेले नागरिक.
सावनेर ः मंकी टॅपिंग टिमने पिंजराबंद केलेली माकडे व जमलेले नागरिक.

सावनेर  (जि.नागपूर): "आधीच मर्कट, तशातही तो मद्य प्याला' या उक्‍तीप्रमाणे जनावरांचा बेसुमार त्रास सुरू असताना मर्कटलीलांचीही त्यात भर पडून त्रस्त झालेल्या सावनेरकरांनी प्रशासनावर रोष व्यक्‍त केला. तशात प्रशासनाची डोकेदुखी वाढून या माकडांचे काय करावे, या विचारात असताना शेवटी प्रशासनाने त्यावर उपाय शोधून काढलाच. सांगलीवरून "मंकी टॅपिंग' चमूला बोलावून मर्कटलीलांवर उतारा शोधला, तेव्हा कुठे सावनेरकरांनी सुटकेचा श्‍वास घेतला. 
शहरात अनेक दिवसांपासून बिनधास्त मर्कटलीला सुरू आहेत. कुणाच्या घरावर उड्या मारून कुणाचे कवेलू फोडणे, कुणाला त्रास देणे, रस्त्यात अचानक उभे राहून रहदारीस अडथळा निर्माण करणे आदी प्रकारांमुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीस आले होते. मर्कटलीलांसोबतच मोकाट जनावरे, कुत्री आदींचाही बेसुमार त्रास वाढला. दिवसेंदिवस नागरिकांसाठी डोकेदुखी वाढविणारी समस्या निर्माण झाल्यामुळे प्रशासनालाही नकोसे झाले. यावर उपाय म्हणून नगर परिषदेने "मंकी टॅपिंग टीम'बोलावून मर्कटलीलांसोबतच मोकाट जनावरांवरही पायबंद घातल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा श्‍वास घेतला. शहरात मुख्य रस्त्यावर वर्षभरापासून जनावरे कळपाने ठिय्या मांडत आहेत; तर काही जनावरे इकडून तिकडे मोकाट फिरत असल्याने रहदारीला अडचण व किरकोळ अपघातांना निमंत्रण देणारे वर्तन सुरू असताना अलीकडे माकडांची त्यात भर पडली होती. एवढेच नव्हे तर गल्लीबोळात कुत्र्यांच्या प्रमाणात झालेली वाढ व वस्तींमध्ये काही दिवसांपासून माकडांच्या मर्कटलीलांनी उच्छाद मांडल्यामुळे लहान मुले, वयोवृद्ध मंडळी व महिलांची डोकेदुखी वाढली. अशावेळी नागरिकांच्या तक्रारींवर लक्ष देऊन नगरपालिका प्रशासनाने सांगली जिल्ह्यातील मिरझ येथील "मंकी टॅपिंग टिम'ला बोलावून माकडे पकडण्याची मोहीम नुकतीच सुरू केली. या चमूने आतापर्यंत 146 माकडांना पिंजऱ्यात अडकवून जंगलात सोडले. अजूनही वस्तीमध्ये बरीच माकडे आहेत. त्यांनाही पिंजऱ्यात अडकविण्यासाठी या चमूचे निरीक्षण सुरू आहे. माकडांचा कळप कुठे येतो, कुठे बसतो, पिंजरा ठेवायचा कुठे व कसा या निरीक्षणानंतर रात्रीच्या वेळी झाडाच्या खाली पिंजरा ठेवला जातो. पोळा मैदानावर मोकाट जनावरांनी ठिय्या मांडल्याने रस्त्यावरील जनावरांची संख्याही आता कमी झाली. नागरिकांना उशिरा का होईना, या गंभीर समस्येपासून थोडाफार दिलासा मिळाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com