संपूर्ण गावाने पाहिली ‘त्यांची’ धिंड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 ऑगस्ट 2016

जादूटोण्याचा संशय - तीन महिलांसह आठ जणांविरुद्ध गुन्हे 

गिरड (जि. वर्धा) - मंगळवारी (ता. १९) सायंकाळी मंगरूळ (ता. समुद्रपूर) गावात जादूटोणा केल्याच्या अंधश्रद्धेतून राजकीय क्षेत्रात वावरणारी महिला तसेच वृद्धाला मारहाण करून त्यांची धिंड काढण्यात आली. हा निंदनीय प्रकार घडत असताना संपूर्ण गाव उघड्या डोळ्यांनी मूकदर्शक बनले होते.  

जादूटोण्याचा संशय - तीन महिलांसह आठ जणांविरुद्ध गुन्हे 

गिरड (जि. वर्धा) - मंगळवारी (ता. १९) सायंकाळी मंगरूळ (ता. समुद्रपूर) गावात जादूटोणा केल्याच्या अंधश्रद्धेतून राजकीय क्षेत्रात वावरणारी महिला तसेच वृद्धाला मारहाण करून त्यांची धिंड काढण्यात आली. हा निंदनीय प्रकार घडत असताना संपूर्ण गाव उघड्या डोळ्यांनी मूकदर्शक बनले होते.  

मंगरूळ येथील राजकीय क्षेत्रात वावरणाऱ्या एका महिलेवर जादूटोणा केल्याचा आरोप करून त्यांना मारहाण करण्यात आली. त्यांना या कामी मदत केली म्हणून देवराव श्रावण तुराळे (वय ६६) यांनाही मारहाण केली. नंतर शेंदूर फासून गावातून धिंड काढण्यात आली. काही वेळात गिरड पोलिस गावात दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला. 

मंगरूळ गावात गुरुपौर्णिमेच्या दिवशी आरोपी जया तिजारे आणि तिच्या परिवारातील सदस्यांनी जादूटोणा केल्याचा आरोप करीत संबंधित महिला आणि देवराव तुराळे यांना चंद्रपूर जिल्ह्यातील भिसी गावात फरीदबाबा दर्ग्यावर नेले. तेथे जया तिजारेच्या अंगात देव आला. 

या दोघांनीच मला करणी केली, असे तिने सांगितले. यानंतर दोघांनाही गावात आणण्यात आले. हनुमान मंदिराच्या पटांगणात देवराव तुराळे यांना विवस्त्र करून शेंदूर फासण्यात आला व मारहाण केली. तसेच गावातून धिंड काढली. आरोपी महिलांनी पीडित महिलेचीही धिंड काढण्याचा प्रयत्न केला. हा सगळा प्रकार गाव उघड्या डोळ्यांनी पाहत होता, हेही चौकशीत पुढे आले आहे. 

पीडित महिला आणि वृद्धाने मंगळवारी (ता. १९) रात्री पोलिस ठाणे गाठले. मारहाणीत जखमी झाल्यामुळे दोघांनाही येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून सेवाग्राम रुग्णालयात हलविण्यात आले. गिरड पोलिसांनी घटनेचा प्राथमिक तपास करून रात्री ११.३० वाजता आरोपी अरुण तिजारे, नरेश निखाडे, योगेश तांदूळकर, प्रशांत तिजारे, पूजा तिजारे, नंदा तिजारे, अमर निखाडे, शालू निखाडे (सर्व रा. मंगरूळ) यांच्याविरुद्ध जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हे दाखल केले; मात्र अद्याप कुणालाही अटक केली नाही.

दोष एवढाच...

पीडित महिलेने आरोपी पूजा तिजारे हिला सहा महिन्यांपूर्वी स्वतःच्या शेतात मजुरीसाठी नेले होते, एवढाच तिचा दोष. तेव्हापासून पूजाची तब्बेत बिघडली. याला संबंधित महिलेने केलेला जादूटोणाच कारणीभूत असल्याच्या अंधश्रद्धेतून हा प्रकार घडला.  

मानसिकतेवर आघात 

पीडित महिलेला भरचौकात मारहाण करून आरोपी महिलांनी तिची  धिंड काढण्याचा प्रयत्न केला. परिणामी, पीडित महिलेच्या मानसिकतेवर मोठा आघात झाला आहे.

Web Title: Saw the entire village of "public disgrace