मुख्याधिकारी, नगराध्यक्षांनी केला घोटाळा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जुलै 2019

नरखेड : नगर परिषदेच्या घरकुल योजनेच्या विकास आराखड्याच्या देयकांमध्ये मुख्याधिकारी माधुरी मडावी व नगराध्यक्ष अभिजित गुप्ता यांनी घोटाळा केल्याचा आरोप नगर परिषदेचे उपाध्यक्ष अजय बालपांडे व विरोधी पक्षनेते हरिकांत माळोदे यांनी केला आहे.

नरखेड : नगर परिषदेच्या घरकुल योजनेच्या विकास आराखड्याच्या देयकांमध्ये मुख्याधिकारी माधुरी मडावी व नगराध्यक्ष अभिजित गुप्ता यांनी घोटाळा केल्याचा आरोप नगर परिषदेचे उपाध्यक्ष अजय बालपांडे व विरोधी पक्षनेते हरिकांत माळोदे यांनी केला आहे.
नगर परिषदेच्या वतीने घरकुल योजना राबविण्यात आली होती. पालिकेने घरकुलाचा डीपीआर बनविण्याचे कंत्राट अकोला येथील रामदेवबाबा चॅरिटेबल ट्रस्ट सोसायटीला दिले होते. त्यात घोटाळा झाल्याचा दावा तत्कालीन पालिका सदस्य व विद्यमान नगराध्यक्ष अभिजित गुप्ता यांनी केला होता. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती. 20 जानेवारी 16 रोजी आयकर विभागाद्वारा मुख्याधिकारी यांना नोटीसद्वारे रामदेवबाबा चॅरिटेबल सोसायटीकडून 3 कोटी 29 लक्ष 57 हजार रुपये घेणे असून ती रक्कम आयकर विभागाला देण्यात यावी. यासोबतच देयक रामदेवबाबा सोसायटीला दिल्यास नगर परिषद पूर्णपणे जबाबदार असेल असेही कळविले. मात्र, याची माहिती मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांनी सभागृह सदस्यांना दिली नाही.
रामदेवबाबा सोसायटीने डिसेंबर 2016 ला उच्च न्यायालयात "ऑर्बिटेशन' अपील केली. त्यात उच्च न्यायालयाने 22 सप्टेंबर 2016 रोजी दिलेला निर्णय 27 जून 2018 च्या आदेशान्वये रद्द केला. उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध अपील करणे आवश्‍यक होते, मात्र मुख्याधिकारी माधुरी मडावी व नगराध्यक्ष अभिजित गुप्ता यांनी त्याची दखल घेतली नाही. सभागृहासमोर विषय उपस्थित केला नाही. यासंबंधी कायदेशीर सल्लाही घेतला नाही.
कक्ष अधिकारी मुंबई यांनी 10 जुलै 19 रोजी पत्र पाठवून रामदेवबाबा सोसायटीला 2 कोटी 65 लक्ष 50 हजार रुपये देयकाची अदायगी तत्काळ करण्यात यावी असे कळविले. यावर कार्यवाही करताना नगरसेवकांना विश्वासात न घेता 2 कोटी 65 लक्ष 50 हजार रुपये रामदेवबाबा सोसायटीच्या खात्यात उतावीळपणे 11 जुलै रोजी जमा केल्याचा आरोप बालपांडे यांनी केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: scam news