यंदा शेतकऱ्यांना करावा लागणार बियाणे टंचाईचा सामना!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 2 June 2020

यावर्षी शेतकऱ्यांचा कल हलक्‍या वाणांकडे अधिक दिसून येत आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत कमी बियाणे उपलब्ध झाल्याने पावसाळ्यात बियाणांची टंचाई निर्माण होण्याची शक्‍यता आहे.

तुमसर (जि.भंडारा) : हा महिना शेतकऱ्यांसाठी लगबगीचा आहे. शेती नांगरून तयार आहे. वाट आहे ती मान्सुनची आणि पेरणीची. त्यासाठी बियाणांची खरेदी महत्त्वाची. व्यापाऱ्यांनी बियाणे विक्रीची तयारी केली आहे. जून महिना सुरू होताच तालुक्‍यातील कृषी केंद्रावर अनेक प्रकारची धानाची बियाणे उपलब्ध आहेत. सध्याच्या बाजारात वेगवेगळ्या कंपन्यांच्या धानाच्या 40 प्रजातींची बियाणे उपलब्ध आहेत. परंतु, यावर्षी शेतकऱ्यांचा कल हलक्‍या वाणांकडे अधिक दिसून येत आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत कमी बियाणे उपलब्ध झाल्याने पावसाळ्यात बियाणांची टंचाई निर्माण होण्याची शक्‍यता आहे.
धान उत्पादक परिसरात पावसाळा सुरू होण्यापूर्वी शेतकरी मशागतीच्या कामाला सुरुवात करतात. शेती तयार केल्यावर कोणत्या प्रकारचे पीक घ्यावे याबाबत आपसांत चर्चा व बाजारात फेरफटका मारून माहिती घेतात.
बाजारातील कृषी केंद्रांत अनेक कंपन्यांचे सुधारित व संकरित बियाणे उपलब्ध झाले आहे. सध्या या कृषी केंद्रावर धानाचे 40 पेक्षा अधिक प्रजातींची बियाणे विक्रीसाठी आलेली आहेत. बियाण्यांच्या तीन किलो ते 25 किलोच्या बॅग उपलब्ध आहेत. हायब्रीड बियाणे 300 रुपये किलो, सुधारित बियाणे 60 ते 70 रुपये किलो आणि प्रचलित बियाणे 30 ते 35 रुपये किलो आहेत. यात हलके, मध्यम व अधिक कालावधीचे बियाणे उपलब्ध आहे. सध्या बाजारात बारिक तांदळाचा चांगला भाव नाही. उलट ठोकळ धानाला हमीभाव व बोनस मिळतो. यामुळे शेतकऱ्यांचा कल धानाच्या हलक्‍या वाणाकडे अधिक दिसून येत आहे.
यंदा कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे सर्व कामांना उशीर होत आहे. आतापर्यंत कारखाने व वाहतूक बंद होती. त्यामुळे बाजारातही मागणीपेक्षा कमी प्रमाणात बियाण्यांचा पुरवठा झाला आहे. पाऊस सुरू झाला असला तरी, बाजारात शेतकऱ्यांचीही कमी उपस्थिती असल्याने दुकानदार चिंतेत आहेत.
लॉकडाउनचा परिणाम आतापर्यंत लॉकडाउन असल्याने कृषी केंद्र मालकांनी कमी गुंतवणूक केली आहे. कंपन्या, व्यापारी व शेतकरी अशा सर्वच वर्गाला आर्थिक समस्येचा सामना करावा लागत आहे. त्याचा फटका या व्यवसायावरही आहे. भीतीमुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी आहे.
लॉकडाउन संपला तरी, वाहतुकीची समस्या आहे. मागील वर्षी सिपला व सोनम कंपन्यांच्या बियाणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यामुळे यंदा या दोन कंपन्यांच्या बियाणांवर बंदी आहे. या संकटाच्या काळात बियाणांच्या किंमती दोन ते तीन टक्‍क्‍यांनी वाढल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली आहे.

सविस्तर वाचा - सावधान! स्वच्छतागृह ठरत आहेत धोकादायक
विभागाने उपाययोजना कराव्यात
कोरोना संक्रमणाच्या समस्येत बियाणांचा मागणीपेक्षा कमी पुरवठा दिसून येतो. त्यामुळे हंगामात बियाणांचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून कृषी विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पावसाळ्यात बियाणे, खतांची टंचाई निर्माण झाल्यास काळाबाजार व शेतकऱ्यांची लूट होण्याची भीती नाकारता येत नाही. त्यासाठी कृषी विभागाने नियोजन करून शेतकऱ्यांना पुरेसे बियाणे, खते उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: scarcity of seeds this year