अभिनंदनीय!जगभरातील उपक्रमशील शाळांच्या यादीत अतिदुर्गम असरअल्लीतील शाळेची नोंद

तिरुपती चिट्याला
Thursday, 4 June 2020

शहरातील नामांकित शाळांना मागे टाकत नक्षलग्रस्त सिरोंचा तालुक्‍यातील असरअल्ली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेने साता समुद्रापलिकडे नावलौकिक मिळविला आहे.

सिरोंचा(जि.गडचिरोली ) : प्रत्येकच पालकाला आपले मूल मोठ्या नामवंत शाळेत शिकावे असे वाटत असते. शहरी भागात ते अनेकांना शक्‍यही होते. मात्र ग्रामीण भागात जिथे शिक्षणच दुष्प्राप्य असते तिथे नामवंत शाळा मिळणे कठीणच. जशी मिळेल तशी शाळा आणि जसे मिळेल तसे शिक्षण घेॅन या विद्यार्थ्यांना समाधान मानावे लागते. अलिकडे मात्र ग्रामीण भागातही ध्येयवेडे शिक्षक विद्यार्थी घडविण्याचे कार्य गावखेड्यातही करीत आहेत. आणि त्याची पावती नुकतीच असरअल्ली सारख्या गावातील शाळेच्याकार्याला मिळाली आहे.
शहरातील नामांकित शाळांना मागे टाकत नक्षलग्रस्त सिरोंचा तालुक्‍यातील असरअल्ली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेने साता समुद्रापलिकडे नावलौकिक मिळविला आहे. या शाळेतील शिक्षकाने विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम तसेच प्रकल्प तयार केले. याशिवाय तंबाखू मुक्तीसाठी केलेल्या प्रयत्नांची दखल युनेस्को असोसिएट स्कूल नेटवर्क या जागतिक दर्जाच्या शैक्षणिक व सामाजिक संघटनेने घेतली असून असरअल्ली येथील शाळेचा 180 देशातील उपक्रमशील शाळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण टोकावर असलेल्या आणि महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या सिरोंचा तालुक्‍यातील अतिदुर्गम असरअल्ली गावातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळेचे मुख्याध्यापक खुर्शीद शेख यांच्या अथक परिश्रमामुळे या शाळेला नावलौकिक मिळाला आहे. गेल्या पाच वर्षांपासून शाळेत विविध शालेय उपक्रम राबविले जात असून अनेक शैक्षणिक प्रकल्प शिक्षण विभागाला सादर करण्यात आले आहेत. युनेस्को असोसिएट स्कूल नेटवर्क ही जागतिक दर्जाचे शैक्षणिक सामाजिक व वैज्ञानिक स्तरावर काम करणारी शासकीय संघटना असून जगातील 180 देशातील उपक्रमशील शाळांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी ही संघटना काम करीत आहे. या संघटनेद्वारे 2030 पर्यंत शैक्षणिक, सांस्कृतिक व वैज्ञानिक ध्येय ठरविण्यात आले आहे. यात युनेस्को असोसिएट स्कूल नेटवर्कचे सदस्य असलेल्या शाळा व विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. या उपक्रमासाठी गेल्या वर्षी जगभरातील 60 शाळांची निवड करण्यात आली होती. त्यात असरअल्ली येथील जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळेचाही समावेश होता. गेले वर्षेभर युनेस्को असोसिएट स्कूल नेटवर्कच्या मार्गदर्शनाखाली विविध शालेय उपक्रम व प्रकल्पावर काम सुरू आहे.

सविस्तर वाचा - का घेतला महिलांनी घरीच वटपौर्णिमा साजरी करण्याचा निर्णय, वाचा

विशेष म्हणजे रशियन ओपन हाक स्कूल सोबत संयुक्त उपक्रमासाठी फॉलोअप करण्यात आले असून व्ही. सी. .द्वारे किंवा प्रत्यक्ष विविध उपक्रम तसेच कार्यशाळेत विद्यार्थी व शिक्षकांना सहभागी केले जाणार आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: School in Asaralli included in 180 schools of world