फळ्यावर दुःखी माणसाचे चित्र काढून विद्यार्थ्याने केली आत्महत्या...वाचा, असे का घडले?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

ब्रह्मपुरी तालुक्‍यातील चौगान येथील कृषक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याने वर्गखोलीतच गळफास लावून आत्महत्या केली. लिखित रवींद्र बुरांडे (वय 18) असे मृताचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. ही घटना सोमवारी (ता. 3) सकाळच्या सुमारास उघडकीस आली.

ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) : चौगान येथे कृषक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय आहे. याच गावात बुरांडे कुटुंबीय राहतात. रवींद्र बुरांडे यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. मोठा मुलगा अनिकेत हा बीए अंतिम वर्षाला आहे. अनिकेत आर्मीची तयारी करीत असून, त्याची निवड जवळपास झाली आहे. मुलगी दहावीला, तर लिखित कृषक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात बारावीत शिकत होता.

लिखितने वर्गखोलीतच रविवारी (ता. 2) सायंकाळी गळफास लावून आत्महत्या केली. लिखितने रविवारी (ता. 2) सायंकाळी गावातील किराणा दुकान गाठले. तेथून दोरी विकत घेतली. हे साहित्य घेऊन तो घरी आला.

जीवनाचा केला शेवट

लिखितने जवळपास रात्री दहा वाजता एका बॉटलमध्ये पाणी भरले. शौचाकडे जातो असे सांगून तो घराबाहेर पडला. वाटेत त्याला शेजारी भेटला. त्यानेही लिखितला विचारणा केली. त्यानंतर लिखित घराकडे परतला. रात्री घरातील सर्व कुटुंब झोपल्यावर तो घराबाहेर पडला. त्याने रात्रीच कृषक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय गाठले. वर्गखोलीतील फळ्यावर काही लिहून त्याने जीवनाचा शेवट केला.

No photo description available.
ब्रह्मपुरी : फळ्यावर लिहून ठेवलेले शेवटचे शब्द.

अन ते दृश्‍य पाहून विद्यार्थिनी घाबरल्या

सोमवारी (ता. 3) सकाळी महाविद्यालय उघडले. सकाळचे सत्र असल्याने बारावीच्या मुली वर्गखोलीत आल्या. आल्याक्षणी त्यांना लिखित गळफास लावलेल्या स्थितीत दिसून आला. त्यांनी लागलीच याची माहिती शाळेचे प्राचार्य, शिक्षकांना दिली. त्यानंतर प्राचार्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

त्यानंतर सकाळपासून लिखितच्या शोधात असलेल्या बुरांडे कुटुंबीयांना या घटनेची माहिती देण्यात आली. त्याच्या आत्महत्याचे कारण वृत्त लिहीपर्यंत कळले नाही. अधिक तपास ब्रह्मपुरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रमोद मक्‍केश्‍वर करीत आहेत.

जाणून घ्या : पत्नीच्या प्रियकराने केला पतीचा गेम...

फळ्यावर दुःखी माणसाचा चेहरा

लिखितने आत्महत्या करण्यापूर्वी वर्गखोलीतच फळ्यावर काही लिहून ठेवले होते. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने फळ्यावर एका दुःखी माणसाचे चित्र रेखाटले. "i am not perfect but I am honest"i don't want to live my life"असे लिहूनसुद्धा ठेवले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: school class student commit suicide at chandrapur