शाळा बंद; शाळा सुरू?

file photo
file photo

नागपूर : उन्हाचा तडाखा वाढल्याने जिल्हा परिषदेने 2 मेपासून प्राथमिक आणि माध्यमिक शाळा बंद करण्याचे आदेश काढले. एका दिवसातच दोन्ही विभागाने हे आदेश फिरवित पूर्वीप्रमाणेच शाळा बंद होईल असे स्पष्ट केले. यावरून माध्यमिक विभागाने तत्काळ पत्र काढून 13 मेपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचे स्पष्ट केले. प्राथमिक विभागाने शुक्रवारी (ता.3) आदेश काढल्याने शिक्षकांमध्ये संभ्रम वाढून शुक्रवारी (ता.3) काही शाळा सुरू तर काही शाळा बंद असा प्रकार दिसून आला.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा संदर्भ देत 30 एप्रिल रोजी प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी एक पत्र काढून जिल्हा परिषदेअंतर्गत असलेल्या सर्व शाळांना 2 मेपासून 25 जूनपर्यंत सुट्या जाहीर केल्या. शिक्षकांनी 1 मे रोजी निकाल जाहीर करून 2 मेपासून सुट्या असल्याचे सांगितले. 2 मे रोजी प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी एक पत्र निर्गमित करून सुटीच्या कालावधीत पटनोंदणी, शाळा सोडण्याचे व इतर दाखले देणे व कार्यालयीन कामे शिक्षकांनी आळीपाळीने करावी, असे निर्देश दिले. शुक्रवारी (ता.3) प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी पुन्हा नव्याने पत्र निर्गमित करून शिक्षकांना पुन्हा पूर्वीच्याच नियोजनाप्रमाणे 9 मेपर्यंत शाळेत जाण्याचे निर्देश दिले. त्यामुळे शिक्षकांचा सुटीचा उत्साह एका दिवसातच मावळला. सूचनांमध्ये वारंवार बदल होत असल्याने शिक्षक हैराण झाले आहेत. पुन्हा उद्या वेगळे काही पत्र तर येणार नाही ना अशी शंका शिक्षकांना सतावत आहे.
अतिउत्साहाच्या भरात निर्णय
जिल्हाधिकारी यांचे पत्रात विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांना मे महिन्यात शाळेत बोलावू नये. तसेच अतिरिक्त वर्ग अथवा अन्य कारणाने विद्यार्थ्यांना शाळेत बोलावलेच तर सकाळी 11 वाजताच्या आत त्यांना सुटी द्यावी असे निर्देश होते, शैक्षणिक सत्र 1 मे रोजी संपवावे असे कोणतेही निर्देश या पत्रात दिले नव्हते. परंतु, जिल्हाधिकारी यांचे पत्र असल्याने शिक्षणाधिकाऱ्यांनी पत्राचा अर्थ समजून न घेताच अतिउत्साह दाखवत 2 मेपासून सुट्या जाहीर करून टाकल्या. या अतिउत्साहामुळेच आज आपले स्वतःचेच पत्र रद्द करण्याची पाळी शिक्षणाधिकाऱ्यांवर आली.

शिक्षण विभागाकडून अतिउत्साह दाखवत घाई गडबडीत निर्णय घेतल्याने शिक्षकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शिक्षण विभागाचा हा निर्णय पूर्णत: तुघलकीपणाचा असून तत्परतेने निर्णय घेण्याची सवय नसल्याने ही स्थिती निर्माण झाली असावी.
-लीलाधर ठाकरे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा नागपूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com