शालेय पोषण आहार भाजपच्या घशात

file photo
file photo

नागपूर : शहरातील शाळांमध्ये शालेय पोषण आहार देण्यासाठी दहा दिवसांपूर्वी शहरातील दहा संस्थांना कंत्राट देण्यात आले. मात्र, योजनेअंतर्गत शिजविलेल्या पोषण आहाराचा पुरवठा करण्यासाठी नेमलेल्या संस्था या भारतीय जनता पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या असल्याने या प्रक्रियेवर शंका निर्माण होत आहे.
शहरात आतापर्यंत केवळ अक्षयपात्र फाउंडेशन संस्थेमार्फत दक्षिण-पश्‍चिम मतदारसंघातील शाळांना शिजविलेल्या पोषण आहाराचा पुरवठा केला जात होता. इतर शाळांना धान्यादी मालाचा पुरवठा करण्यात येत होता. मात्र, शहरातील शाळांनाच शिजविलेल्या पोषण आहाराचा पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यातूनच सहा मे रोजी जाहिरात देत निविदा मागविण्यात आल्या. 26 मेपर्यंत निविदा प्रक्रियेतून 20 संस्थांच्या 21 निविदा प्राप्त झाल्या. यात दिल्लीतील सहा आणि आसाममधील सक्षम संस्था तर शहरातील 13 संस्थांचा समावेश होता.
निविदांमधून संस्थांची निवड करण्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठण केले होते. यात प्राथमिक शिक्षणाधिकारी सचिव, अपर आयुक्त उद्योग महामंडळ, अन्न व औषध प्रशासन विभाग, महिला व बालकल्याण विभाग आणि महापालिकेतील सदस्याचा समावेश केला होता. समितीद्वारे संस्थांची तपासणी करून दहा संस्थांची निवड करण्यात आली. त्यांची नावे काही दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आली. यात दिल्लीत शालेय पोषण आहार देणाऱ्या नामवंत संस्था व आसाममधील संस्थेला शहरात "किचन' नसल्याचे कारण देत नकार देण्यात आला. याउलट शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या संस्थांना महत्त्व देत पोषण आहाराचे कंत्राट बहाल केल्याचे निदर्शनास येते. यामुळे एकूणच प्रक्रियेवर संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, या संस्थांची नावे देताना त्या ठिकाणी दिलेल्या ई-मेल आयडीमधील नावे आणि भ्रमणध्वनी क्रमांकातून ते भाजपचे पदाधिकारी असल्याचे निदर्शनास येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com