लॉटरीनंतर पालकांचा प्रवेशास नकार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

नागपूर - इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये आरटीईअंतर्गत लॉटरी लागल्यानंतरही इच्छा असलेली शाळा न मिळाल्याने अनेक पालकांनी प्रवेश घेण्यास नकार दिला आहे. यामुळे १० एप्रिलपर्यंत फक्त तीन हजार ४३७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. कोटा पूर्ण झाला नसल्याने शिक्षण विभागाने पुन्हा १३ एप्रिलपर्यंत आरटीई प्रवेशास मुदतवाढ दिली आहे.

जिल्ह्यातील ६२२ शाळांमधील २५ टक्के राखीव ६,९२५ जागांवर प्रवेश प्रक्रिया राबविण्यात  येत आहेत. पहिल्या सोडतीमध्ये ५,३५७ विद्यार्थ्यांचे इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश निश्‍चित करायचे आहेत. ज्या विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्‍चित झाला, त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेमध्ये रहिवासी, आधार कार्ड, पासपोर्ट, निवडणूक ओळखपत्र, वीज, टेलिफोन बिल, घरपट्टी, दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडे करारनामा द्यावा लागतो. त्यामुळे सुरुवातीच्या काळात भाडे  कराराचा खोडा निर्माण झाल्याने काही प्रवेश रखडले होते. त्यामुळे प्रवेशासाठी मुदतवाढही दिली होती. प्रवेशासाठी मुदतवाढ दिल्यामुळे लॉटरी लागूनही मनाजोगी शाळा न मिळाल्याने पालक  प्रवेश घेत नसल्याचे दिसून येत आहे. आता तीन दिवसांची मुदतवाढ दिली आहे. मुदतवाढीनंतरही फारसे प्रवेश होतील असे दिसत नाही. आरटीईच्या पहिल्या ड्रॉमध्ये शाळेपासून एक किमी अंतर असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम प्रवेश दिला जातो. त्यानुसार लॉटरी काढण्यात आली. मात्र, यातील बहुतांश लोकांना मनाजोगी शाळा न मिळाल्याने अनेकांनी अद्याप प्रवेश घेतलेला नाही. पहिल्या फेरीत प्रवेश न घेणाऱ्यांनी दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश नाकारला आहे.

Web Title: school RTE admission lottery education