बोर्डाच्या मान्यतेशिवाय घेतली जाते परीक्षा

मंगेश गोमासे
रविवार, 26 ऑगस्ट 2018

नागपूर  : शिक्षण मंडळाची मान्यता नसतानाही 1 हजार 166 शाळांमध्ये दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या शाळांना वारंवार बोर्डातर्फे मान्यता घेण्यासाठी सूचना केली जाते. विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून बोर्डाला मंजुरी द्यावीच लागते. याचा फायदा घेऊन कुठलीच शाळा सूचनेची दखल घेत नाही.

शाळांना बोर्डाच्या परीक्षेत सहभागी होण्यासाठी दरवर्षी मंडळाची मान्यता घेणे गरजेचे असते. दरवर्षी बोर्डाकडून तसे स्मरणपत्र शाळा आणि उपसंचालक कार्यालयाला पाठविण्यात येते. हे पत्र मिळताच शाळांकडून उपसंचालक कार्यालयात प्रस्ताव सादर करावा लागतो. हा प्रस्ताव येताच, उपसंचालक कार्यालयाकडून शाळांची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे काम शिक्षणाधिकाऱ्यांकडे सोपविले जाते. मात्र, शिक्षणाधिकाऱ्यांकडून याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे 2013 पासून विभागातील सहा जिल्ह्यांत अनेक शाळांना मंडळाची मान्यता मिळालेली नाही. तशी अधिकृत यादीच मंडळाने प्रकाशित केली आहे. त्यात नागपूर जिल्ह्यातील शाळांची संख्या सर्वाधिक 485 असून शहरातील नामांकित शाळांचा यादीत समावेश आहे. त्या खालोखाल गडचिरोली जिल्ह्याचा समावेश आहे.
उपसंचालक कार्यालयाची उदासीनता
बोर्डाकडून वारंवार सूचना आल्यानंतरही शाळा प्रस्ताव पाठवीत नाही. त्या शाळांना साधी सूचना देण्याचे काम उपसंचालक कार्यालयाकडून केले जात नाही. त्यामुळे शिक्षणाधिकाऱ्यांपर्यंत ही बाब जात नाही. शिक्षण विभागातील बरीच पदे रिक्त असल्यामुळे शाळांची तपासणी करून अहवाल देणे शक्‍य होत नसल्याचे कळते.
शाळांनी बोर्डाची मान्यता घेणे आवश्‍यक आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून याबद्दल शिथिलता देण्यात आली. यापुढे असे होणार नसून शाळांनी मान्यता घ्यावीच लागेल. तसे केल्यास विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू दिले जाणार नाही.
रविकांत देशपांडे, अध्यक्ष, नागपूर विभागीय शिक्षण मंडळ.

Web Title: school students news