संग्रामपूरमध्ये शाळांची परिस्थिती विदारक

पंजाबराव ठाकरे
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

संग्रामपूर (बुलडाणा) : आदिवासी बहुल संग्रामपूर तालुक्यात शिक्षण विभागाच्या दुर्लक्षाने शाळांचे विदारक चित्र आहे. यातूनच बोडखा गावात यंदा सहावा वर्ग सुरू केल्याने विद्यार्थ्यांची कुचंबणा करून पालकांना एक प्रकारे मानसिक दृष्ट्या शिक्षा देण्याचे काम तालुका शिक्षण विभागाकडून होत असल्याचे दिसत आहे.

संग्रामपूर (बुलडाणा) : आदिवासी बहुल संग्रामपूर तालुक्यात शिक्षण विभागाच्या दुर्लक्षाने शाळांचे विदारक चित्र आहे. यातूनच बोडखा गावात यंदा सहावा वर्ग सुरू केल्याने विद्यार्थ्यांची कुचंबणा करून पालकांना एक प्रकारे मानसिक दृष्ट्या शिक्षा देण्याचे काम तालुका शिक्षण विभागाकडून होत असल्याचे दिसत आहे.

शैक्षणिकदृष्ट्या संग्रामपूर तालुका मागास असल्याने चार वर्षांपूर्वी या तालुक्यात मानवविकास मिशन उपक्रम राबविला जात आहे. यामध्ये शिक्षण या विषयावर जोर देण्यात आला असला तरी जिल्हा आणि तालुका शिक्षण विभाग याबाबत दक्ष दिसत नाही. म्हणूनच बोडखा येथे यंदा  सुरू केलेला सहावीचा वर्ग बंद करण्याचा प्रसंग पालकांवर आणला जात आहे .

बोडखा तालुका ठिकाणा पासून चार किमी अंतरावरच गाव आहे. येथे इयत्ता पाचवीपर्यंत जिल्हा परिषदेची मराठी शाळा आहे. लागूनच भिलखेड आणि काकोडा गावात पाचवी नंतर शिक्षण घेण्याची सुविधा नाही. शेतात काम करून मजुरी करणाऱ्या कुटूंबाना आपल्या पाल्यांना चार किमी अंतरावर सहावी पासून पाठविण्याचा खर्च परवडणारा नाही. पाचवी नंतर गावातच गरजेनुसार वर्ग वाढ करण्याचा नियम ही आहे. त्यासाठी केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समिती याचा समन्वय गरजेचा असावा. गतवर्षी या ठिकाणी कुणीही पुढाकार घेतला नाही म्हणून पाचवीचा सहावा झाला नाही.

यंदा शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन सहावा वर्ग सुरू तर केला. परंतु त्याला शिक्षण विभागाचाच जास्त खोडा दिसत आहे. या ठिकाणी वर्ग झाले सहा आणि वर्ग खोल्या चार, यामुळे एका खोलीत दोन वर्ग बसविले जातात. शिक्षक संख्या पाच त्यातही दररोज पूर्ण शिक्षक हजर असतीलच याची शाश्वती नसते. कुणी ना कुणी सुटीवर असतेच. या भानगडीत विद्यार्थ्यांचे शिक्षणावर परिणाम होत आहे. एका वर्ग खोलीत दोन वर्ग बसवून शिक्षकाची शिकविण्याची आणि विद्यार्थ्याची शिकायची मनस्थिती रहात नाही.

बाजूलाच शाळेची खोली आहे त्यात अंगणवाडी भरवली जाते. दुसरीकडे अंगणवाडीची इमारत असल्याने ही इमारत खाली करून त्यात एक वर्ग शिफ्ट होऊ शकतो. पण तालुका शिक्षण विभागच प्रभारी कारभार असल्याने त्यात हा वर्ग शिक्षण विभागाचे मते जबरदस्ती सुरू झाल्याने पालकांना आणि विद्यार्थ्यांना मानसिक त्रास कसा होईल हेच पाहिले जात आहे. येथील शिक्षणाचा दर्जा खालावत असल्याने बरेच पालकांनी आपले पाल्य बाहेरगावी खाजगी शाळा मध्ये टाकली आहेत. सद्यस्थितीत ही येथून मुले काढून दुसरीकडे टाकन्याचा काही पालकांनी मानस व्यक्त केला आहे . असे जर झाले तर सुरू झालेला सहावा वर्ग बंद पडेल. या कडे जिल्हा शिक्षण  प्रशासनाने लक्ष देण्याची नितांत गरज दिसत आहे . सोबतच या परिसरात असलेली जुनी इमारत विद्यार्थ्याचे अंगावर कधी पडेल याचा भरवसा उरला नसल्याने विद्यार्थ्याचे जीवाला धोका निर्माण झाला आहे.

Web Title: schools are in bad condition in sangrampur