भरधाव स्कॉर्पिओने आई-मुलाला चिरडले; महाल परिसरात तणाव

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 9 November 2019

अपघातासाठी कारणीभूत वाहनाचा शोघ घेण्यासाठी पोलिस सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचा प्रयत्न करीत होते. रात्री उशिरापर्यंत परिसरात तणावाचे वातावरण कायम होते.

नागपूर : घरी परतत असलेल्या आई आणि चिमुकल्या मुलाला भरधाव स्कॉर्पिओने चिरडले. यात आईचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर मुलाचा मेयो रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास महाल परिसरातील नाईकरोड येथे ही दुर्दैवी घटना घडली. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

शबाना मोहम्मद जहीद (30) असे मृत आईचे तर मोहम्मद अरहान जहीद (12) असे मुलाचे नाव आहे. ते महालातील नाईकरोड, मशीदजवळील रहिवासी आहेत. मृत महिलेचे पती फळविक्रीचा व्यवसाय करतात. रात्री 10 वाजताच्या सुमारास शबाना मुलासोबत सीपी ऍण्ड बेरार कॉलेजजवळून पायीच घरी चालली होती. त्याचवेळी महालकडून भरधाव स्कॉर्पिओ आली. दोघांनाही जोरदार धडक दिली. काही अंतरापर्यंत त्यांना फरपटत नेले. घटनेनंतर स्कॉर्पिओचालक रेशीमबागच्या दिशेने निघून गेला. माय-लेकाच्या किंचाळ्या ऐकून परिसरातील रहिवासी मदतीला धावून आले. तोवर आईचा मृत्यू झाला होता. मुलाची हालचाल सुरू असल्याने तातडीने मेयो रुग्णालयात पाठवून देण्यात आले. तिथे उपचारादरम्यान मुलाचाही मृत्यू झाला. 

घटनेनंतर परिसरात जमाव गोळा झाला. माहिती मिळताच कोतवाली पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. महिलेचा मृतदेह मेडिकल रुग्णालयात पाठवून देण्यात आला. नागरिकांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण केल्याने तणाव निर्माण झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: scorpio crushed mother and son