जोडीदाराचा शोध महागला...

मनीषा मोहोड
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

नागपूर : तुळशीच्या लग्नानंतर उपवर मुला-मुलींची लगीनघाई सुरू झालेली आहे. आता सर्व व्यवहार डिजिटल झाल्याने जोडीदाराचा शोधही ऑनलाइन घेतला जात आहे. यासाठी असंख्य मॅट्रिमोनिअल साइट्‌स खुल्या झाल्या असून, यात जोडीदार शोधणे सोयीस्कर असले तरी, यासाठी मोजावे लागणारे शुल्क मात्र तीन वर्षांच्या तुलनेत तिपटीने वाढले आहे. 

नागपूर : तुळशीच्या लग्नानंतर उपवर मुला-मुलींची लगीनघाई सुरू झालेली आहे. आता सर्व व्यवहार डिजिटल झाल्याने जोडीदाराचा शोधही ऑनलाइन घेतला जात आहे. यासाठी असंख्य मॅट्रिमोनिअल साइट्‌स खुल्या झाल्या असून, यात जोडीदार शोधणे सोयीस्कर असले तरी, यासाठी मोजावे लागणारे शुल्क मात्र तीन वर्षांच्या तुलनेत तिपटीने वाढले आहे. 

ऑनलाइन विवाह नोंदणीलाही उत्स्फूर्त प्रतिसाद तरुणाईकडून मिळत आहे. याचाच फायदा मॅट्रिमोनिअल साइट्‌सने घेतला असून, पाच वर्षांपूर्वी दहा हजारांवर असलेले पॅकेज यंदा तब्बल 80 हजारांपर्यंत पोहोचले आहे. भारतातलं ऑनलाइन मॅरेज मार्केट आता जवळजवळ 52 कोटी रुपयांचे आहे. ते मोठं असलं तरी, अत्यंत खर्चीक आहे. दरम्यान, विविध समाजांनीही आपापले समाज संकेतस्थळ सुरू केले आहेत. विशिष्ट जात, पोटजातीप्रमाणे उपवरांची नोंदणी केली जात आहे. नोंदणी शुल्क भरताना संबंधितांना तीन पर्याय दिले जातात. त्यात तीन महिने, सहा महिने आणि एक वर्ष अशा पद्धतीने पॅकेज दिले जात असून, त्यात किती उपवरांचे परिचयपत्र दाखविले जातील, याबाबत सविस्तर माहितीही संकेतस्थळावर दिली आहे. मॅट्रिमोनिअल साइट्‌स केवळ स्थळ सुचवतात; पण आलेल्या स्थळाची तपासणी करण्यापासून त्याच्याशी गाठ बांधून त्याच्यासोबत नातं निभावण्याचं काम संबंधित कुटुंबालाच करावं लागतं. 

लग्न नको, पण पॅकेजेस आवर 
मॅट्रिमोनिअल साइट्‌सची सुविधा काही मर्यादित सुविधांसहच मोफत वापरता येते. पण, तुम्हाला एखाद्या आवडलेल्या प्रोफाईलशी बोलायचे असेल किंवा भेटायचे असेल तर त्यासाठी विविध पॅकेजेस घ्यावी लागतात. तरच तसे ऍक्‍सेस मिळू शकतात. एक व्यवसाय म्हणून हे ठीक असले तरी ही पॅकेजेस विकण्यासाठी या वेबसाइट संभावित ग्राहकांना फोन करून भंडावून सोडतात, अशी तक्रार मॅट्रिमोनिअल साइट्‌सचे वापरकर्ते करतात. त्यातच ही पॅकेजेस बऱ्यापैकी महागडी (अगदी 80 हजार रुपयांपर्यंत) असतात आणि त्यासाठी पुन्हा मर्यादित कालावधीचे बंधन असते. मग त्या विशिष्ट कालावधीत तुम्हाला त्या पोर्टलचा वापर करावा लागेल, अन्यथा फुकटचा खर्च होऊ शकतो. 

सुरक्षिततेसाठी उपाय 
जोडीदार निवडीसाठी शक्‍यतो स्वतंत्र ई-मेल आयडी करावा 
स्वत:च्या ऐवजी पालकांचा फोन नंबर द्यावा. आपल्यासाठी उपयुक्त वेबसाइट कोणती याचा शोध घ्यावा. जातीनिहाय शोध देणारी वेबसाइट किंवा जातीला सेवा देणारी वेबसाइट निवडा कोणत्याही वेबसाइटवरून नेटवर गेलेली माहिती-फोटो खासगी राहत नाही माहिती लिहिताना मनाविरुद्ध किंवा स्वभावाविरुद्ध काहीही लिहू नये वेबसाइट्‌स सुचवलेल्या स्थळाची खात्री करणे गरजेचे आहे समोरून योग्य प्रतिसाद आला तरी फेसबुकवरून, फोनवरून माहिती काढावी. 

हल्ली पालक एका शहरात तर मुले दुसऱ्या शहरात राहतात. त्यामुळे पूर्वीप्रमाणे ठरवून कांदेपोहे कार्यक्रम घेणे शक्‍य होत नाही. मॅट्रिमोनिअल साइट्‌समुळे स्थळांचा शोध घेणे सोयीचे असले तरी खर्चिक आहे. शिवाय या वेबसाइटस फक्त डाटाबेस देतात. त्यामुळे माहितीची विश्वासार्हता पाहणे ही आपली जबाबदारी ठरते. 
- मुग्धा चव्हाण, नागपूर 
 

Web Title: search for partner become expensive