भंडारा शहरात सेकंडहॅण्ड ऑटोडिलचे प्रस्थ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

- महागाई वाढल्याने खरेदीकडे ग्राहकांचा कल

भंडारा : गेल्या काही वर्षांत शहरात जुन्या गाड्यांची विक्री करणाऱ्या ऑटोडिल व्यवसायाचे प्रस्थ मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आजघडीला सेकंडहॅण्ड गाड्यांची विक्री करणाऱ्या दुकानांची संख्या 15 ते 20 च्या घरात आहे. सामान्य वर्गातील ग्राहकांकडून अशा गाड्यांना मागणी असली; तरी या पूर्ण खातरजमा केल्याशिवाय त्यांची खरेदी करणे जोखीम पत्करणारे ठरू शकते.
अलीकडे तरुण पिढीत नवनवीन मोटारसायकल चालविण्याचे फॅड आहे. मार्केटमध्ये कंपन्यांनी जी नवी गाडी लॉंच केली, ती श्रीमंत व उच्च-मध्यमवर्गातील मुलांना हवी असते. ही चैन पुरविण्यासाठी त्यांचे पालकही मागेपुढे पाहत नाहीत. त्यामुळे वर्ष, दोन वर्षे वापरलेली मोटारसायकल विकून त्याऐवजी नव्या कोऱ्या गाड्या घेतल्या जातात. अशा गाड्या शोधणारे दलालसुद्धा त्यासाठी टपून बसले असतात. परंतु, सेकंडहॅण्ड मार्केटमध्ये येणारे प्रत्येकच वाहन सुरक्षित असेल याची हमी देता येत नाही. अनेकदा अपघात झाल्याने नको असलेल्या, चोरीच्या, दस्तऐवज नसलेल्या गाड्यांचा यात भरणा असतो. या दुकानांमध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या गाड्यांपैकी बहुतांश गाड्या या बाहेरून आलेल्या असतात. त्यामुळे या वाहनांची गॅरंटी कमी असते. कमी गुंतवणुकीत चांगला नफा देणारा व्यवसाय म्हणून अनेकांनी यात शिरकाव केला आहे. नव्या गाड्या विकून शोरूम मालकांना मिळणाऱ्या लाभापेक्षा अधिक कमाई हे जुन्या गाड्यांचे विक्रेते करीत आहेत. शिताफीने ग्राहक हेरण्यात त्यांचा हातखंडा असून खेड्यापाड्यातील व सामान्य वर्गातील नागरिक हे त्यांचे सावज असतात.
एकदा ग्राहक दुकानात शिरताच त्यांना अत्यंत सफाईने गाडी विकली जाते. आधी ऍडव्हॉन्स भरण्यासाठी घाई केली जाते. मग ग्राहकाला दुसऱ्यांदा गाडी घेण्याशिवाय पर्याय उरत नाही.

ग्राहकांनी सजगता बाळगावी
जुन्या गाड्यांची खरेदी करताना ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. अनेकदा चोरीच्या किंवा भंगार झालेल्या गाड्यासुद्धा चकचकीत करून ग्राहकांच्या माथी मारल्या जातात. बनावट दस्तऐवज देऊन दिशाभूल करण्याचे प्रकार अनेकदा समोर आले आहेत. त्यामुळे वाहन खरेदी करणाऱ्याने आवश्‍यक कागदपत्रांची पडताळणी करणे आवश्‍यक आहे. सेकंडहॅण्ड गाडी घेणे सोपे असले; तरी दुकानदारांवर विसंबून खातरजमा न केल्यास आपली फसवणूक होण्याचे प्रकार होतात.

नव्या गाड्यांवर अधिकचा भुर्दंड
सणासुदीच्या दिवसांत नवीन गाड्या खरेदी करण्यावर लोकांचा भर असतो. परंतु, गेल्या महिन्यापासून नवीन वाहन खरेदी महागली आहे. नवीन वाहनांची नोंदणी करताना दुचाकीसाठी पाच वर्षांचा व मोटारींसाठी तीन वर्षांचा विमा (किमान थर्ड पार्टी) बंधनकारक केला आहे. नवीन नियमामुळे तीन व पाच वर्षांच्या विम्याचे शुल्क एकत्रित द्यावे लागते. त्यामुळे नवीन वाहनांची खरेदी अंदाजे तीन ते पाच टक्‍के महागली आहे. त्यामुळेही ग्राहकांचा जुन्या वाहनांच्या खरेदीकडे कल दिसतो.
---


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Secondhand autodill growth in Bhandara city