शेतकऱ्यांना बियाणे, खते कमी पडू देणार नाही : कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे आश्‍वासन

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 4 July 2020

स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषिदिन प्रत्यक्ष बांधावर जाऊन कृषीविषयक तंत्रज्ञानाचा प्रसार व प्रचार होण्यासाठी कृषी संजीवनी सप्ताह संपूर्ण महाराष्ट्रात राबविला जात आहे. त्यानिमित्त आज कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत शेतकरी संवाद कार्यक्रमाचे आयोजन नैनपूर येथे करण्यात आले होते. 

कोरची (गडचिरोली) : राज्यातील खरीप व रब्बी हंगामादरम्यान कोणत्याही शेतकऱ्याला आवश्‍यक बी-बियाणे व खते कमी पडू देणार नाही, असा विश्‍वास राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी गडचिरोली येथे शेतकऱ्यांना दिला. ते वडसा तालुक्‍यातील नैनपूर येथे कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आले होते. 

स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषिदिन प्रत्यक्ष बांधावर जाऊन कृषीविषयक तंत्रज्ञानाचा प्रसार व प्रचार होण्यासाठी कृषी संजीवनी सप्ताह संपूर्ण महाराष्ट्रात राबविला जात आहे. त्यानिमित्त आज कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत शेतकरी संवाद कार्यक्रमाचे आयोजन नैनपूर येथे करण्यात आले होते. नैनपूर येथील शेतकरी गजेंद्र ठाकरे यांच्या शेतावर सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गजेंद्र ठाकरे यांचा मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी मंत्रिमहोदयांनी ठाकरे यांचे कौतुक करून याप्रकारे शेकडो शेतकरी तयार व्हावेत, यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना कृषी विभागाला दिल्या.

नैनपूर येथे आरमोरी मतदारसंघाचे आमदार कृष्णाजी गजबे, भंडारा येथील आमदार नरेंद्र भोंडेकर, वडसा नगराध्यक्षा शालूताई दंडवते, विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले, माजी आमदार रामकृष्ण मडावी, हरीश मने, सुरेंद्रसिंग चंदेल, आनंदराव गेडाम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, डॉ. कराडे, प्रकल्प संचालक आत्मा गडचिरोली तानाजी खर्डे विभागीय कृषी अधिकारी वडसा, विशाल मेश्राम उपविभागीय अधिकारी वडसा, दिशांत कोळप कृषी विकास अधिकारी गडचिरोली, नीलेश गेडाम तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते. 

महाराष्ट्रात खरीप हंगामात 16 लाख क्विंटल बियाण्यांची आवश्‍यकता आहे. त्यासाठी कृषी विभागाने राज्यात 17 लाख बियाण्यांची व्यवस्था केली आहे. राज्यात 70 टक्के पेरण्या झालेल्या आहेत. उर्वरित पेरण्याही लवकरच पूर्ण होती, अशी माहिती मंत्र्यांनी दिली. पिकांची उत्पादकता वाढावी, गुणवत्ता सुधारावी याकरिता आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांना पोहोचविण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी कृषी संजीवनी सप्ताहादरम्यान प्रत्यक्ष बांधावर जाऊन मार्गदर्शन करत आहेत. याचा फायदा तळागाळातील शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. कृषिदिनाचे महत्त्व सांगताना ते म्हणाले की, स्व. वसंतराव नाईक यांनी विकासाला वळण देणाऱ्या योजना राबविल्या त्यामुळे आपण त्यांचा आदर्श म्हणून 1 जुलै कृषिदिन म्हणून साजरा करतो. या पार्श्वभूमीवर कृषी सप्ताहाच्या माध्यमातून प्रगतिशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन, शासनाच्या योजना सर्वांपर्यंत पोहोचविल्या जाणार आहेत. 

ठळक बातमी : मी माय शरीर विकीन म्हणजे विकीन, जे होईल ते होईल जीवाचं, वाचा वारांगनाची व्यथा...

गडचिरोली जिल्ह्यात माझी तिसरी भेट आहे, असे मंत्र्यांनी सांगून मला येथील अडचणी लक्षात येत आहेत. त्या मी सोडविण्यासाठी राज्यस्तरावर नक्की प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविणे, गुणवत्ता वाढविणे यासाठी जिल्ह्यात चांगले उपक्रम राबविले जाणार आहेत, असे ते म्हणाले. या पाठीमागे शेतकऱ्यांचे जिल्ह्यात मोठे नुकसान झाले होते. याची भरपाई द्या, असे निवेदन आले आहे. मी याबाबत लवकरच राज्यस्तरावर प्रश्न मांडणार आहे. 

शेतकऱ्यांनी गटशेती करावी 
कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना गटशेती व फार्मर प्रोड्यूसर कंपन्यांच्या माध्यमातून शेती करा व विकास साधा, असे आवाहन केले. गटशेतीमधून शेतकरी बळकट होत आहेत. तसेच कंपन्यांच्या माध्यमातून प्रगत शेती करा, असे ते यावेळी म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seeds, fertilizers will not fall short