बुटीबोरीत कारमधून 70 लाख जप्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

टाकलघाट/ बुटीबोरी  : नागपूरहून चंद्रपूरकडे जाणाऱ्या एका कारमधून बुटीबोरी पोलिसांनी 70 लाख रुपये नगदी जप्त केले. ही कारवाई बुटीबोरीपासून 3 किमी अंतरावरील पोलिस चेक नाक्‍यावर दुपारी 1 वाजताच्या सुमारास करण्यात आली. या रकमेवर चंद्रपूर येथील चढ्ढा ट्रान्सपोर्टच्या संचालकांनी दावा केला आहे.

टाकलघाट/ बुटीबोरी  : नागपूरहून चंद्रपूरकडे जाणाऱ्या एका कारमधून बुटीबोरी पोलिसांनी 70 लाख रुपये नगदी जप्त केले. ही कारवाई बुटीबोरीपासून 3 किमी अंतरावरील पोलिस चेक नाक्‍यावर दुपारी 1 वाजताच्या सुमारास करण्यात आली. या रकमेवर चंद्रपूर येथील चढ्ढा ट्रान्सपोर्टच्या संचालकांनी दावा केला आहे.
या प्रकरणी बुटीबोरी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अश्विन गौतम ढाले (वय 29) व दिलीप देवीदास इंगळे (वय 53, दोघेही रा. इंदोरा, नागपूर) असे आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी कार क्रमांक एमएच 31 सीएच 5009 ने नागपूरहून चंद्रपूरला जात होते. चेक पोस्टवर कारची झडती घेतली. कारमधील बॅगला चक्‍क कुलूप लावलेले होते. बॅगचे कुलूप उघडल्यावर त्यामध्ये शंभर व पाचशेच्या नोटांचे बंडल आढळून आले. एकूण रक्कम 70 लाख आहेत. याबाबत विचारणा केली असता ते काहीच सांगू शकले नाहीत. यावरून दोन्ही आरोपींना अटक करून बुटीबोरीचे ठाणेदार हेमंत चांदेवार यांनी गुन्हा दाखल केला. ही कारवाई शशी शेंडे, गजेंद्र चौधरी, मयूर ढेकळे यांनी केली.
पैशाबाबत संभ्रम
कारमध्ये मिळालेल्या 70 लाख रुपयांच्या पैशाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. ही रक्कम चढ्ढा टान्सपोर्टची असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. टान्सपोर्टचे कोळसा वाहतुकीचे काम असून चंद्रपूर, नागपूर व उमरेडसह अनेक ठिकाणी कार्यालये व अन्य व्यवसाय आहेत. ही रक्कम चढ्ढा ट्रान्सपोर्टच्या उमरेड येथील कार्यालयात जमा होती. ते चंद्रपूर येथील कार्यालयात पाठविण्यात येत होती. मात्र, आरोपींकडे रकमेसंदर्भात कोणतेही प्रकारे पुरावे नसल्याने ती रोकड जप्त केली.
ही रक्कम वैध असून रकमेसंदर्भात सर्व कागदपत्रे दाखवून ती सोडविण्यात येईल. सुटी असल्याने रक्कम जमा होत राहिली. ही रोकड चंद्रपूर येथे आणली जात होती.
- मनीष चढ्ढा, संचालक चढ्ढा ट्रान्सपोर्ट, चंद्रपूर

Web Title: seize 70 lakh in butibori