कुख्यात सिजो चंद्रनचे पलायन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जुलै 2019

नागपूर : अनेक गंभीर गुन्ह्यांसह मोक्काचा आरोपी सिजो एन. आर. चंद्रन (38) याने पोलिसांना गुंगारा देत सुपर स्पेशालिटी रुग्णालयातून पलायन केले. शनिवारी सकाळी उघडकीस आलेल्या या घटनेने शहर पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.

नागपूर : अनेक गंभीर गुन्ह्यांसह मोक्काचा आरोपी सिजो एन. आर. चंद्रन (38) याने पोलिसांना गुंगारा देत सुपर स्पेशालिटी रुग्णालयातून पलायन केले. शनिवारी सकाळी उघडकीस आलेल्या या घटनेने शहर पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.
कुख्यात सिजो मूळचा हैदराबादचा असून सध्या दिल्लीत राहतो. नागपूरसह, मध्यप्रदेश, आंध्र प्रदेशातही त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. 11 डिसेंबर 2018 पासून तो नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आहे. त्याला क्षयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयरोगानेही ग्रासले आहे. श्‍वास घ्यायला त्रास होण्यासह खोकलल्यास थुंकीतून रक्त येत असल्याने त्याला सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील श्‍वसन रोग विभागाच्या वॉर्ड क्रमांक 43 मध्ये दाखल करण्यात आले होते. फारच चतुर आणि कावेबाज असल्याची पूर्ण कल्पना असल्याने त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी शिपायांची नेमणूक करण्यात आली होती. दोन ते चार शिपाई पूर्णवेळ त्याच्यासोबत असायचे. शनिवारी सकाळी डॉक्‍टर रुग्णांचा रक्तदाब तपासण्यासाठी वॉर्डात आले. याचदरम्यान त्याच्या सूचनेवरून आरोपी सेलचे शिपाई राजेंद्र ठवरे आणि कमलेश त्याला प्रातर्विधीसाठी घेऊन गेले. दोन्ही शिपाई शौचालयाबाहेर पाळतीवरच उभे होते. बराचवेळ लोटूनही सिजो बाहेर न निघाल्याने पोलिसांनी दार उघडले. आत भलताच व्यक्ती दिसला. त्यांनी लगबगीने सिजोचा शोध सुरू केला. पण, तो आढळत नसल्याने पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानंतर सर्वत्र शोध सुरू करण्यात आला. त्याला पकडण्यासाठी बसस्थानक, रेल्वेस्थानकावरही पथक पाठविण्यात आले. अजनी पोलिसांनी सिजोवर आणखी एका गुन्ह्याची नोंद केली आहे. शहर पिंजून काढल्यानंतरही वृत्त लिहीपर्यंत तो पोलिसांना गवसू शकला नव्हता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seizo Chandran's escape