सेल्फी काढायला नव्हे, काम करायला आलोय - जितेंद्र जोशी

मनोज खुटाटे
बुधवार, 2 मे 2018

जलालखेडा - भविष्यात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईवर मात करून महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करण्यासाठी अनेकांनी कंबर कसली आहे. आपणही याचा भाग व्हावा म्हणू या कामाला सुरुवात केली. मागील दोन वर्षांपासून महाराष्ट्रात फिरतो आहे, ते फक्त सेल्फी काढून प्रसिद्धीसाठी नव्हे तर गावे पाणीदार कशी होतील यासाठीच. उमठा येथेही गावकऱ्यांसोबत घाम गाळणार आहे, अशी स्पष्टोक्ती मराठी चित्रपट अभिनेता जितेंद्र जोशी यांनी दिली. 

नरखेड तालुक्‍यातील उमठा येथे सोमवारी व मंगळवारी जितेंद्र जोशी श्रमदान करून वॉटर कप स्पर्धेच्या कामाची पाहणी करणार आहेत. या निमित्त ते उमठा गावात पोहोचल्यावर त्यांनी सकाळशी संवाद साधला. उमठा गावात अचानक आलेल्या जोशी यांनी गावात फिरून स्पर्धेचा आढावा घेतला. गावकऱ्यांसह सहभोजनदेखील केले. या वेळी जोशी म्हणाले, आमिर खान, डॉ. पोळे व सत्यजित भटकळ यांनी वॉटर कप स्पर्धेच्या सभा घेतल्या होत्या. मागील वर्षी गावात झालेल्या कामांची पाहणी केली व गावे पाणीदार झाल्याचा अनुभव आला. 

धर्माच्या, जातीच्या द्वेष निर्माण केला जात आहे. चिड निर्माण करणारे अनेक प्रकार सुरू आहेत. तर दुसरीकडे वॉटर कप स्पर्धेच्या कामासाठी गावात गटातटाचे राजकारण बाजूला सारून लोक एकत्र येऊन गावे पाणीदार करीत आहे. हे चित्र खरोखर मनाला दिलासा देणारे आहे.

यावेळी त्यांच्यासोबत पाणी फाउंडेशनचे विदर्भ समन्वय चिन्मय फुटाणे, धीरज, तालुका समन्वयक हेमंत पिखलमुंडे, रुपेश वाळके आदी उपस्थित होते. सोमवारी उमठा येथे जोशी मुक्कामी असून मंगळवारी ते उमठा गावातील महाश्रमदान शिबिरात उपस्थित राहून उत्साहवर्धन करणार आहेत.

४५ दिवस श्रमदान
नागराज मंजुळे यांच्याकडून वेळू येथे ‘तुफान आलं या’ गाण्याच्या शूटिंगदरम्यान प्रोत्साहन मिळाले. वॉटर कपनिमित्त गावागावांत आबाल वृद्धांपासून सर्वच सहभागी होत असल्याचे पाहून आनंद होतो.  चार हजार गावे पाणीदार होत आहेत. मागील वर्षी उत्तर सोलापूर जिल्ह्यातील हिराज गावातील एका १४ वर्षाच्या समाधान नावाच्या मुलाने सतत ४५ दिवस श्रमदान केले. सरपंच यांनी त्याला  बक्षीस म्हणून ३०० रुपये दिले होते. त्यातून त्याने तीन घमेले आणले. तो मुलगा माझ्यासाठी प्रेरणादायी आहे असेही यावेळी जोशी यांनी सांगितले.

Web Title: selfie work jitendra joshi