यवतमाळात सेना-भाजपची मुसंडी

राजकुमार भीतकर : सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017

दिग्गजांचा पराभव
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे, जिल्हा परिषद सदस्य देवानंद पवार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व राष्ट्रवादीचे आमदार मनोहर नाइकांचे चिरंजीव ययाती नाईक, जिल्हा परिषदेचे सभापती सुभाष ठोकळ व लता खांदवे आदींना पराभवाचा सामना करावा लागला. तर, राष्ट्रवादीचे दिवंगत नेते सुरेशबाबू लोणकर यांचे चिरंजीव आशीष लोणकर व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रमेश मानकर यांचे चिरंजीव निमीष मानकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नीलय नाईक यांचे पुतणे अमेय नाईक, राम देवसरकर यांच्यासह काही नवीन तरुणांनी प्रथमच जिल्हा परिषदेत प्रवेश केला आहे.

यवतमाळ : यवतमाळ जिल्हा परिषदेच्या 61 गट व 16 पंचायत समित्यांच्या 122 गणांसाठी आज, गुरुवारी मतमोजणी पार पडली. दुपारी तीनपर्यंत जिल्ह्यातील सर्वच ठिकाणचे लागलेले निकाल थक्क करणारे आहेत. पहिल्यांदाच मतदारांनी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसला साफ नकार देत राज्यात व केंद्रात सत्तेत सहभागी असलेल्या भाजपसह शिवसेनेला मोठा कौल दिला आहे.

नोटाबंदी व शेतमालाचे पडलेले भाव या पार्श्‍वभूमीवर ही निवडणूक ग्रामीण भागासाठी अतिशय महत्त्वाची होती. ही निवडणूक भाजपला जड जाईल, असे राजकीय विश्‍लेषक सांगत होते. मात्र, भाजपने अपेक्षेप्रमाणे 17 जागांवर विजय मिळविला. अपक्ष एक उमेदवारही भाजपला जवळचा आहे. पालकमंत्रिपदावरून भाजपपासून फारकत घेतलेल्या शिवसेनेने स्वतंत्रपणे मुसंडी मारीत 20 जागा काबीज केल्या. मात्र, कॉंग्रेसला 12 व राष्ट्रवादी कॉंग्रेसला 11 जागांवरच समाधान मानावे लागले. यात अपक्षाला एकच जागा मिळाली. परंतु, जिल्हा परिषद व जिल्ह्यातील 16 पंचायत समित्यांवर मतदारांनी शिवसेना व भाजपला कौल दिला. त्यामुळे हे मुद्दे केवळ हवेतील ठरले.

जिल्ह्यातील पंचायत समिती गणांचा विचार करता भाजपला 33, कॉंग्रेस 26, राष्ट्रवादी कॉंग्रेस 18 व शिवसेनेला 40 गण आणि स्थानिक विकास आघाड्यांना पाच जागांवर विजय मिळाला. या वेळी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप व शिवसेना जिल्हा परिषद निवडणूक स्वतंत्रपणे लढले. त्यामुळे निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली होती. पालकमंत्रिपदावरून भाजप व शिवसेनेत चांगलीच जुंपली होती. शिवसेनेचे नेते व महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्याकडील जिल्ह्याचे पालकमंत्रिपद काढून भाजप आमदार मदन येरावार यांना दिल्याने शिवसैनिक नाराज होते. भाजपने विश्‍वासघात केल्याचा आरोप करून ही निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला. स्वतंत्र लढूनही शिवसेनेने ग्रामीण भागात मुसंडी मारली. त्या पाठोपाठ भाजपने ग्रामीण भागात आपले अस्तित्व सिद्ध केले. या वेळी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस स्वतंत्रपणे लढल्याने त्यांचे पानिपत झाले. सत्ता स्थापण्यासाठी 31 सदस्य अनिवार्य आहेत. पहिल्यांदाच यवतमाळ जिल्हा परिषदेत शिवसेना सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे.

यापूर्वीही शिवसेना, राष्ट्रवादी व भाजपसोबत युतीत सत्तेत सहभागी झाली होती. मात्र, प्रथमच भाजप व शिवसेनेला स्वतंत्र सत्ता स्थापण्याची संधी चालून आली आहे. राज्यस्तरावर युतीचा निर्णय झाल्यास भाजप व शिवसेनेला सत्तेत सहभागी व्हावे लागेल. असे न झाल्यास दोन्ही पक्षांजवळ कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची कुबडी वापरण्याची संधी आहेच. शिवसेना व राष्ट्रवादीचे सख्य सर्वांनाच माहीत आहे. विधान परिषदेत प्रा. तानाजी सावंत यांना निवडून देण्यात राष्ट्रवादीचा मोठा हातभार आहे. तर, भाजप स्वतंत्र सत्ता स्थापन करून ग्रामीण भागात शक्ती वाढवू शकतो. शिवसेना राष्ट्रवादी व अपक्षाला सोबत घेऊन सत्ता स्थापन करू शकतो.

कॉंग्रेस, राष्ट्रवादीला सोबत घेऊन भाजपला सत्ता स्थापण्याची संधी आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री भाजपचे असल्याने आणि राज्य व केंद्रात भाजपचे सरकार असल्याने भाजपला सत्ता स्थापन करणे सोपे आहे. परंतु, राज्यस्तरावर सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय भाजप-सेनेच्या नेत्यांनी घेतल्यास दोन्ही पक्षांसमोर अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला हाच पर्याय आहे. पहिल्या सत्रात सेनेला अध्यक्षपद, तर दुसऱ्या सत्रात भाजपला, अशी स्थिती राहू शकते.

Web Title: Sena-BJP won in Yawatmal