नागपूर : 11 वर्षाच्या मुलीवर 62 वर्षाच्या वृद्धाचा बलात्कार 

अनिल कांबळे 
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

 पेन गिफ्ट देण्याचे आमिष दाखवून 11 वर्षीय मुलीवर 62 वर्षाच्या दुकानदार वृद्धाने बलात्कार केला.

नागपूर - पेन गिफ्ट देण्याचे आमिष दाखवून 11 वर्षीय मुलीवर 62 वर्षाच्या दुकानदार वृद्धाने बलात्कार केला. ही घटना जरीपटक्‍यात उघडकीस आली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल करून आरोपी नराधम वृद्धास अटक केली. गुल्लूबाबा उर्फ उमेश शंकरराव गुरलवार (रा. जरीपटका) असे आरोपीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 11 वर्षीय मुलगी ही जरीपटक्‍यातील एका नामांकित शाळेत सहाव्या वर्गात शिकते. तिचे आई-वडील मोलमजुरी करतात. सप्टेबर महिन्यात दुपारच्या सुमारास ती पेन विकत घेण्यासाठी वस्तीत असलेल्या जनरल स्टोअर्समध्ये गेली. दुकानात कुणीही नसल्यामुळे दुकानदार वृद्ध गुल्लूबाबा याची नियत फिरली. तिला पेनचे पैसे न घेता गिफ्ट करण्याचे आमिष दाखवले. पैसे वाचणार म्हणून मुलीनेही पेन घेण्यास होकार दिला. मात्र, गुल्लूबाबाने तिला दुकानात येण्यास सांगितले. आतमधल्या खोलीत नेऊन तिच्याशी अश्‍लिल चाळे केले. काही वेळातच त्याने दोन पेन तिच्या हाती दिली आणि पुन्हा दुकानात नेले. ती अल्पवयीन असल्याची माहिती असतानासुद्धा तिच्यावर बलात्कार केला. कुणालाही न सांगण्यासाठी तिला दम दिला. भेदरलेल्या अवस्थेत ती घरी परतली. आईवडील कामावर गेल्यामुळे घरात कुणीही नव्हते. तिने भीतीपोटी आईवडीलांना या प्रकाराची माहिती दिली नाही. 3 नोव्हेंबरला दुपारी पीडित मुलगी फाईल आणण्यासाठी गुल्लूबाबाच्या दुकानात गेली. त्यावेळीही गुल्लूबाबाने लगेच तिला दुकानात ओढले. आतमध्ये नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पुन्हा तिला कुणालाही न सांगण्याची धमकी दिली. मात्र, यावेळी तिने आईला घडलेला प्रकार सांगितला. आईने मुलीसह जरीपटका पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांनी तक्रारीवरून गुल्लूबाबा गुरलवार याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करीत अटक केली. 

डॉक्‍टरमुळे घटना उघडकीस 
4 नोव्हेंबरला पीडित मुलीने पोट दुखत असल्याची तक्रार आईकडे केली. सायंकाळच्या सुमारास आईने तिला डॉक्‍टरकडे नेले. डॉक्‍टरांनी तपासणी केली असता तिच्या अंगावर नखाचे ओरबडे आणि गप्तांगावर जखमा दिसल्या. डॉक्‍टरांना संशय आला. त्यांनी लगेच तिला विश्‍वासात घेऊन विचारपूस केल्यानंतर गुल्लूबाबाने बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची माहिती दिली. 

पालकांनो सावधान...! 
"बॅड टच-गूड टच' याबाबत पालकांनी मुलांना जाणीव करून द्यावी, तुमच्यासोबत काय घडू शकते. याबाबत स्पष्ट बोलावे आणि जागरूक राहावे. पालकांनीच काळजी घ्यावी. सख्ख्या नात्यातीलही व्यक्‍तींवर जास्त विश्‍वास ठेवू नये. जवळच्या संबंधाच्या लोकांकडूनही अशा घटना घडू शकतात. त्यामुळे विशेषतः मुलींशी आईने लैंगिकता या विषयावर स्पष्ट बोलावे आणि मैत्रिपूर्ण संबंध ठेवावे. 

लहान मुलांशी शारीरिक संबंध प्रस्थापित करणे ही मानसिक विकृती आहे. आपण कधी पकडल्या जाणार नाही, असा अतिआत्मविश्‍वास अशा विकृत व्यक्‍तिंमध्ये असतो. तो व्यक्‍ती मात्र सामाजिक परिणामाची चिंता, विचार करीत नाही. अशा व्यक्‍तींचे समूपदेशन करणे गरजेचे आहे. अनेकदा अशा घटनांसाठी इंटरनेटवरील पॉर्न साईट्‌स आणि अश्‍लिल छायाचित्र, व्हिडीओसुद्धा कारणीभूत आहेत. असे कृत्य करणाऱ्यांच्या वयाचा विचार न करता कठोर शिक्षा द्यावी, जेणेकरून असे प्रकार करण्यापूर्वी शंभरदा विचार करावा लागेल. 
-प्रा. राजा आकाश (मानसोपचारतज्ञ)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: senior citizen raped minor girl in nagpur