ज्येष्ठ नागरिक, व्यापाऱ्याला लुटले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

- दुचाकीस्वाराचा धुमाकूळ
- शहरात सलग दोन घटना

अमरावती : बॅंकेतून पैसे काढणाऱ्या व बॅंकेत पैसे भरण्यासाठी जाणाऱ्यांवर पाळत ठेवून लुटणाऱ्या दुचाकीस्वारांनी शहरात चांगलाच धुमाकूळ घातला. सोमवारी (ता. चार) दोन तासांत एका वृद्धाचे 1 लाख, तर व्यापाऱ्याकडून 50 हजार रुपयांची रोख रक्कम हिसकावली.

श्‍यामराव कुरवाळे (वय 65 रा. हिवरखेड, ता. मोर्शी) हे काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या हाताला दुखापत झाली. त्यामुळे त्यांनी क्‍लेम केल्यामुळे त्यांना नियमानुसार काही पैसे मिळाले. ही रक्कम राजापेठ परिसरातील श्री. हिवराळे यांच्या बॅंकखात्यामध्ये जमा झाली. त्यातून त्यांनी सोमवारी (ता. चार) एक लाख रुपये काढले. गावी जाण्यासाठी ते ऑटोमधून मध्यवर्ती बसस्थानकावर जाण्यास निघाले. रेल्वेस्थानक ते बसस्थानक मार्गावर एका धार्मिक स्थळासमोर ऑटोचा वेग कमी झाला होता. तेवढ्यात दुचाकीवर ऑटोचा पाठलाग करून येणाऱ्या दोघांपैकी एकाने ऑटोत बसलेल्या श्री. कुरवाळे यांच्याकडे एक लाख रुपये असलेली बॅग हिसकावून पळ काढला. दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. कुरवाळे यांनी नातेवाइकांना माहिती देऊन शहर कोतवाली ठाण्यात धाव घेतली.
दुसरी घटना जयस्तंभमार्गावर घडली. येथील किशोर दातेराव यांच्या एस. के. टायर या प्रतिष्ठानातील व्यवसायाची पन्नास हजार रुपये बॅंकेत भरण्यासाठी भाचा राजेंद्र नत्थूजी भेरडे यांच्याकडे दिली. भेरडे व दुकानातील कर्मचारी अनिकेत कातोरे हे दोघे पैसे घेऊन पायी बॅंकेकडे जात असताना, एका दुचाकीवर त्यांचा पाठलाग करीत तिघे जण आले. त्यांनी भेरडे यांना चाकू मारला, तर अनिकेतच्या हातात असलेली पन्नास हजार रुपयांची बॅग जबरीने हिसकावून पळ काढला. सायंकाळी साडेचारच्या सुमारास ही दुसरी घटना घडली. दोघांच्याही तक्रारीवरून शहर कोतवाली पोलिसांनी लुटमारीचे गुन्हे दाखल केले.
पाळत ठेवणाऱ्या टोळीचा हात
कोण कधी पैसे काढतो, कोण केव्हा आर्थिक व्यवहारासाठी बॅंकेत जातो, अशा लोकांवर पाळत ठेवणाऱ्या एकाच टोळीचा त्यामागे हात असल्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली. कारण दुचाकीस्वारांनी लुटल्याची एक घटना शनिवारी रात्री राजापेठच्या हद्दीतही घडली होती.
सावधान, सतर्क राहा
कोणताही व्यहार करताना नागरिकांनी सावधान व सतर्क राहणे आवश्‍यक आहे. कोणीतरी आईपल्या मागावर असल्याचे लक्षात येताच नागरिकांनी पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. संशयित व्यक्ती आढळ्यास त्याची सूचनाही पोलिसांना द्यावी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Senior Citizens and Trader`s Robbed