अरे बापरे! या शिलेदारांना ना झोप ना सुट्टी; वरिष्ठ पोलिस निरीक्षक पडले मुर्च्छीत

washim
washim

वाशीम ः कोरोना विरुद्धच्या लढाईत गेल्या दोन महिन्यांपासून पोलिस प्रशासन लढवय्ये शिलेदार ठरले आहेत. मात्र, या शिलेदारांना ना झोप ना सुट्टी, परिणामी यांच्याच आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. वाशीम येथील पाटणी चौकात आज (ता.27) एका वरिष्ठ पोलिस निरीक्षकाला कर्तव्यावर असताना भोवळ येऊन ते खाली पडले. रुग्णालयात नेले असता, त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले.

राज्यामध्ये कोरोनाचा प्रकोप वाढत चालला आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून राज्यातील पोलिस प्रशासन रस्त्यावर कोरोनाशी दोन हात करीत आहे. वाशीम जिल्ह्यामध्ये केवळ आठ रुग्णांची नोंद झाली आहे. ग्रीन झोनमध्ये असलेल्या या जिल्ह्यात कोरोनाला हातपाय पसरविण्यास वाव मिळाला नाही. याचे सर्व श्रेय रस्त्यावर 18 तास कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांनाच जाते. मात्र, हे कर्तव्य या पोलिसांसाठी आता जीवघेणे ठरते की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सकाळी सहा वाजता सुरू होणारे कर्तव्य रात्री दहा वाजता संपते. रात्री आठलाच दुसरी रिलीफ कर्तव्यावर हजर होते.  दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजेपर्यंत हे कोरोना फायटर्स रस्त्यावर लढा देतात. वाशीम जिल्ह्यामध्ये गेल्या दोन महिन्यांत कोणालाही साप्ताहिक रजा मिळाली नाही. परिणामी, कुटुंबापासून गेल्या दोन महिन्यांपासून हे पोलिस दादा दुरावलेले आहेत. नास्ताही रस्त्यावर, जेवनही रस्त्यावर त्यात कर्तव्याचा ताण अशी परिस्थिती असल्याने याची धोक्याची घंटा आज (ता.27) पाटणी चौकात वाजली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय पाटकर गेल्या दोन महिन्यांपासून येथील पाटणी चौकातील चौकीवर कर्तव्यावर आहेत.

रणरणत्या उन्हात गेल्या दोन महिन्यांपासून हा सर्वाधीक वर्दळीचा चौक पाटकर व त्यांच्या शिलेदारांनी राखला आहे. मात्र, आज सकाळी दहा वाजता कर्तव्य बजावत असताना विजय पाटकर एकाएकी मुर्च्छीत पडले. सहकाऱ्यांनी त्यांना उचलून गाडीत टाकले. गाडी सरळ जिल्हा सामान्य रुग्णालयात गेली. येथील डाॅक्टरांनी येथे उपचार होणार नसल्याने अकोला येथे पुढील उपचार घेण्याची शिफारस केली. 

एक खाकी झाली शहीद
महिनाभरापूर्वी कोरोनाशी मुकाबला करताना वाशीम ग्रामीण पोलिस ठाण्यामध्ये कार्यरत असलेले हवालदार बोरकर यांचा खेडेगावातच बीटवर कर्तव्य बजावत असताना हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. मात्र, तरीही पोलिसांना साप्ताहिक रजेचा सुद्धा लाभ मिळाला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com