सुपरमध्ये बाह्यरुग्ण विभागासाठी स्वतंत्र इमारत 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

नागपूर : मेडिकलमध्ये बाह्यरुग्ण विभागात दररोज तीन हजार रुग्णांची नोंद होते. तर, सुपर स्पेशालिटीत एक हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद होते. सुपरमधील बाह्यरुग्ण विभागासाठी असलेली जागा अपुरी पडते. रुग्णांची गर्दी लक्षात घेता, सुपरमध्ये बाह्यरुग्ण विभागासाठी स्वतंत्र इमारतीच्या बांधकामाचा प्रस्ताव सादर करण्याची सूचना मेडिकल प्रशासनाला दिली असल्याची माहिती पुढे आली आहे. 

नागपूर : मेडिकलमध्ये बाह्यरुग्ण विभागात दररोज तीन हजार रुग्णांची नोंद होते. तर, सुपर स्पेशालिटीत एक हजारापेक्षा जास्त रुग्णांची नोंद होते. सुपरमधील बाह्यरुग्ण विभागासाठी असलेली जागा अपुरी पडते. रुग्णांची गर्दी लक्षात घेता, सुपरमध्ये बाह्यरुग्ण विभागासाठी स्वतंत्र इमारतीच्या बांधकामाचा प्रस्ताव सादर करण्याची सूचना मेडिकल प्रशासनाला दिली असल्याची माहिती पुढे आली आहे. 
नेत्ररोगतज्ज्ञांच्या परिषदेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने नागपुरात आले. या वेळी डॉ. लहाने यांनी मेडिकल आणि मेयोला भेट देऊन येथील विविध योजनांचा आढावा घेतला. मेडिकल काउन्सिलच्या बैठकीत डॉ. लहाने यांनी मेडिकल आणि सुपरच्या डॉक्‍टरांशी चर्चा केली. या चर्चेतून सुपरच्या ओपीडीच्या स्वतंत्र इमारतीचा प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली. या वेळी त्यांनी अनेकांना धारेवर धरले. मेडिकलमध्ये अपघाती रुग्णांच्या निदानासाठी कोट्यवधीचे एमआरआय यंत्र खनिकर्म विभागाने दिले होते. ते यंत्र आता कालबाह्य झाले. पुन्हा खनिकर्म विभागाने 15 कोटी रुपयांचा निधी देऊ केला. असे असताना अद्याप मंत्रालयाने खात्यात हा निधी वळता केला नाही. यामुळे चाचण्यांचा खोळंबा होणार असल्याची स्थिती निर्माण झाली. ही माहिती पुढे येताच संचालकांनी डीएमईआरच्या अधिकाऱ्यांचा क्‍लास घेत प्रस्ताव पाठविण्याची सूचना केली. 
मागील भेटीत डॉ. लहाने यांनी कोणालाही न सांगता रेडिऑलॉजी विभागाची पाहणी केली होती. त्या वेळी रुग्णांची वेटिंग लिस्ट बघून ते संतापले होते. विभागप्रमुखांना खडेबोल सुनावले होते. एमआरआयच्या निदानाचा टक्का वाढविण्याची सूचना केली होती. मात्र, एमआरआय यंत्र कालबाह्य ठरल्याने आता ते काही बोलू शकले नाही. एमआरआय यंत्र खरेदीसंदर्भात त्यांनी अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्याशी चर्चा केली. 
प्रसूतिशास्त्र विभागासाठी अतिदक्षता वॉर्ड 
मेडिकलमध्ये सुमारे 1700 खाटा आहेत. मात्र, अतिदक्षता विभागात 20 खाटा आहेत. हे भयावह चित्र येथे दिसून येते. खाटांच्या तुलनेत सुमारे 10 टक्के खाटा अतिदक्षता विभागात असतात. परंतु, या निकषाकडे पाठ फिरवली आहे. स्त्री व प्रसूतिरोग विभागासाठी सुमारे 30 खाटांच्या अतिदक्षता वॉर्डाचा प्रस्ताव सादर करावा, अशीही सूचना या वेळी केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Separate building for outpatient departments in the super