शहरात समांतर सेतू कार्यालय 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जुलै 2018

नागपूर - शहरात समांतर सेतू कार्यालय असून त्यातून विद्यार्थ्यांना बोगस प्रमाणपत्रे देऊन त्यांच्या आयुष्याशी खेळ सुरू आहे. बोगस प्रमाणपत्रे तयार करणाऱ्यांना पोलिस अनेकदा ताब्यात घेऊन सोडून देत असल्याचे नुकतेच एका प्रकरणात उघडकीस आले. समांतर सेतू कार्यालयावर धाड घालून बोगस प्रमाणपत्रे तयार करणारे मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्याची संधी असूनही पोलिस याप्रकरणी गंभीर नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नावावर मोठ्या प्रमाणात बोगस प्रमाणपत्रे वितरित झाल्याची शक्‍यता बळावली आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू कार्यालयात दररोज हजारो विद्यार्थी जातप्रमाणपत्र,  क्रिमिलेअरसह विविध प्रमाणपत्रांसाठी येतात. येथेच बोगस प्रमाणपत्र तयार करणाऱ्यांचे दलाल विद्यार्थ्यांना हेरतात. नुकताच दहेगाव रंगारी येथील विद्यार्थी रवी चुन्नी शर्मा याला असेच बोगस क्रिमिलेअर प्रमाणपत्र मिळाल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी सेतू कार्यालयात ड्युटीवरील पोलिस अविनाश सराफ यांनी पोलिसांना माहिती दिली. 

सदर पोलिसांनी रवी चुन्नी  शर्मा या विद्यार्थ्यासह एका महिलेला ताब्यात घेतले. मात्र, दुसऱ्या दिवशी काहीही घडले नाही, अशा तोऱ्यात ही महिला पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दिसून आली. याप्रकरणातील विद्यार्थी रवी शर्माचे वडील चुन्नीसिंग ठाकूर यांनी प्रमाणपत्रासाठी दिलेले ३२०० रुपये परत मिळाल्याचे ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.  याप्रकरणात सदर पोलिस स्टेशनचे पोलिस  उपनिरीक्षक चौरसिया चौकशी करीत असल्याचे समजते. जिल्हाधिकारी परिसरात अनेकदा बोगस प्रमाणपत्र तयार करणाऱ्यांना अटक करण्यात येते किंवा ताब्यात घेण्यात येते. या ताब्यात  घेतलेल्या व्यक्तीकडून संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्याची आयती संधी सदर पोलिसांना चालून येते. मात्र, अशी कुठलीही मोठी कारवाई न होता, ताब्यातील व्यक्ती पुन्हा काही दिवसांनी जिल्हाधिकारी परिसरात ग्राहकांच्या शोधात दिसून येते. त्यामुळे या रॅकेटला पोलिसांचे संरक्षण तर नाही? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. 

असे उघडकीस आले बोगस प्रमाणपत्र 
सेतू कार्यालयातून मिळणाऱ्या प्रमाणपत्रावर दर्शनी भागातच ’cast certificate part a’ असे लिहिले असते. परंतु, रवी शर्मा या विद्यार्थ्याला मिळालेल्या प्रमाणपत्रातून ही ओळच गायब आहे. याशिवाय या प्रमाणपत्रावरील फाँट, बारीक रेषांमुळेही फरक दिसून येते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी यांची स्वाक्षरी बोगस असून स्टॅम्पमध्येही फरक आहे. 

या बोगस प्रमाणपत्रावर असलेली स्वाक्षरी माझी नाही. ही बनावट स्वाक्षरी आहे. समांतर सेतू कार्यालयाच्या अनेक तक्रारी आहेत. यापूर्वीही असे प्रकार पुढे आले. पोलिसांनी समांतर सेतू कार्यालयावर छापा मारण्याची गरज आहे. नागरिकांनीही सेतू कार्यालयातूनच प्रमाणपत्रे घ्यावे. 
- सुभाष चौधरी, उपजिल्हाधिकारी, महसूल.

Web Title: setu office in nagpur city