स्मार्ट सिटी प्रकल्पावर सातशे कोटींचा खर्च

file photo
file photo

नागपूर : स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यात निवड झाल्यानंतरही संत्रानगरीने अंमलबजावणीत आघाडी घेतली असून आजपर्यंत सातशे कोटींचा खर्च झाला. पॅनसिटीअंतर्गत प्रकल्प पूर्ण झाला. एरिया बेस्ड डेव्हलमपेंटअंतर्गत (एबीडी) पूर्व नागपुरात कामांनी वेग घेतल्याने येत्या काळात या भागाचा चेहरामोहरा बदलणार आहे. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत नागपूर शहराचा समावेश दुसऱ्या टप्प्यात करण्यात आला होता. स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत शहर विकासाच्या 21 प्रकल्पांचा समावेश करण्यात आला होता. एबीडीअंतर्गत 20 प्रकल्प असून पॅनसिटीअंतर्गत स्मार्ट अँड सेफ सिटी प्रकल्प पूर्ण झाला. या प्रकल्पावर 521 कोटी रुपये खर्च झाले आहेत. या प्रकल्पाचा अंमलबजावणी खर्च 385 कोटी असून पुढील पाच वर्षांसाठी देखभाल दुरुस्तीसाठी 135 कोटी खर्च करण्यात येणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत शहरात 1045 किमीचे ऑप्टिकल फायबर टाकण्यात आले असून नागपूरकरांच्या सुरक्षेसाठी सातशे ठिकाणावर 3462 कॅमरे लावण्यात आले आहेत. याशिवाय वायफाय हॉटस्पॉट, स्मार्ट पार्किंग, महापालिकेत सिटी ऑपेरशन सेंटरचे काम पूर्ण झाले. एबीडीअंतर्गत पूर्व नागपुरातील भरतवाडा, पारडी, पुनापूर आणि भांडेवाडीतील 1730 एकर परिसरात स्मार्ट सिटी प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. स्मार्ट सिटी अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलमपेंट कार्पोरेशनने या परिसरात 51.9 किमीच्या मुख्य व अंतर्गत रस्त्यांची कामे सुरू केली आहे. याशिवाय गृहप्रकल्प, सार्वजनिक बाजार, कार पार्किंग, शाळा, आरोग्य केंद्र, कौशल्य विकास केंद्र प्रस्तावित आहे. 3322 कोटींच्या या प्रकल्पावर गेल्या तीन वर्षात 192 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. या भागात तूर्तास 873 कोटींची कामे सुरू असून पुढील काही वर्षात पूर्व नागपूरचा चेहरा-मोहरा बदलणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने 196 कोटी दिले असून राज्य सरकारने 148 कोटी दिले. महापालिकेने 100 कोटी, असे एकूण 444 कोटी रुपये मिळाल्याचे स्मार्ट ऍन्ड सस्टेनेबल सिटी कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे यांनी नमुद केले.
स्मार्ट ऍण्ड सेफ सिटीचे फायदे
स्मार्ट ऍण्ड सेफ सिटी प्रकल्पाचे फायदे आतापासून दिसून येत आहे. या प्रकल्पाअंतर्गत लावलेल्या 3,442 सीसीटीव्हींमुळे पोलिसांना 1,100 गुन्ह्यांची उकल करण्यात यश आले. याशिवाय वाहन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तीन लाखांवर नागरिकांना घरी चालान पाठविण्यात आले.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com