सात माजी महापौर पुन्हा रिंगणात 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

नागपूर - महापालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून, सर्वच पक्षांचे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. यंदाच्या निवडणुकीत तब्बल सात आजी-माजी महापौर पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. 

नागपूर - महापालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून, सर्वच पक्षांचे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. यंदाच्या निवडणुकीत तब्बल सात आजी-माजी महापौर पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. 

विद्यमान महापौर प्रवीण दटके महाल मतदारसंघातून निवडणूक लढण्यास सज्ज झाले आहेत. शेजारच्याच कॉटन मार्केट परिसर असलेल्या प्रभागातून माजी महापौर अर्चना डेहनकर यांनी पक्षाकडे दावेदारी दाखल केली आहे. माजी महापौर, महापालिकेतील विरोधीपक्षनेते तसेच कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्यावर संपूर्ण शहराचीच जबाबदारी आहे. सत्ताधारी भाजपसोबत दोन हात करण्यास ते सज्ज आहेत. माजी महापौर किशोर डोरले पुन्हा कॉंग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. मागील निवडणुकीत कॉंग्रेसने त्यांना उमेदवारी नाकारली होती. यामुळे ते अपक्ष लढले व निवडूनसुद्धा आले. विकास ठाकरे यांनी सर्व नाराज असलेल्या व कॉंग्रेस सोडून गेलेल्या पुन्हा सन्मानाने परत आणण्याची प्रक्रिया सुरू केली. माजी महापौर नरेश गावंडे यांनी पुन्हा उमेदवारी मागितली आहे. माजी महापौर कल्पना पांडे भाजपच्या संपर्क यात्रेत सहभागी होत असून मेडिकल, रेशीमबाग, नंदनवन परिसराचा समावेश असलेल्या प्रभागातून त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. माजी महापौर मायाताई इवनाते भाजपत सक्रिय आहेत. रविनगर, भरतनगर हा त्यांचा परंपरागत प्रभाग सुरक्षित आहे. यामुळे त्या पुन्हा महापालिकेत प्रवेश करणार आहेत. माजी महापौर राजेश तांबे सध्या राजकारणात सक्रिय नाहीत. मात्र, ते कुठल्याही क्षणी भाजप किंवा कॉंग्रेसकडून उमेदवारी आणून एंट्री करू शकतात. माजी महापौर पुष्पा घोडे राजकारणातून बाहेर पडल्या आहेत. अलीकडच्या महापौरांपैकी अनिल सोले विधान परिषदेवर गेले आहेत. भाजपने त्यांच्यावर महापालिकेच्या समन्वयाची जबाबदारी दिली आहे. 

किंगमेकर कोणाकडे? 
महापालिकेच्या राजकारणातील किंगमेकर म्हणून ओळखले जाणारे माजी महापौर अटलबहादूरसिंग यांचा गट सक्रिय आहे. आजारपणामुळे अटलबहादूरसिंग सध्या जास्त बाहेर पडत नाहीत. मात्र, खंदे समर्थक आजही त्यांच्यासोबत आहेत. त्यांची भाजपशी जवळीक असली तरी मागील निवडणुकीत त्यांनी लोकमंचच्या उमेदवारांना कॉंग्रेसच्या पंजा चिन्हावर लढविले होते. मात्र, यंदा कॉंग्रेसचे काही खरे दिसत नसल्याने त्यांच्या आदेशाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Seven former mayor again in election