सात महिन्यांचा बिबट सालई शिवारातून ताब्यात 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 डिसेंबर 2016

हिंगणी (जि. वर्धा) - शिकार न मिळाल्याने अत्यवस्थ होऊन नाल्यात निपचित पडलेल्या सात महिन्यांच्या बिबट्याला ताब्यात घेतल्याची घटना शुक्रवारी (ता. 23) सकाळी सेलू तालुक्‍यातील सालई (पेवठ) शिवारात घडली. या बिबट्याला पिपरी (मेघे) येथील करुणाश्रमात आश्रय देण्यात आले आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तातडीने उपचार करण्यात आले. तपासणी अहवालानंतरच त्याला बोर अभयारण्यात सोडण्यात येईल, अशी शक्‍यता वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. 

हिंगणी (जि. वर्धा) - शिकार न मिळाल्याने अत्यवस्थ होऊन नाल्यात निपचित पडलेल्या सात महिन्यांच्या बिबट्याला ताब्यात घेतल्याची घटना शुक्रवारी (ता. 23) सकाळी सेलू तालुक्‍यातील सालई (पेवठ) शिवारात घडली. या बिबट्याला पिपरी (मेघे) येथील करुणाश्रमात आश्रय देण्यात आले आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तातडीने उपचार करण्यात आले. तपासणी अहवालानंतरच त्याला बोर अभयारण्यात सोडण्यात येईल, अशी शक्‍यता वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. 

सालई (पेवठ) येथील पुरुषोत्तम सावरकर यांच्या शेताजवळच्या नाल्यात बिबट्याचा बछडा मृतावस्थेत असल्याची माहिती ग्रामस्थांनी हिंगणीचे वनपरिक्षेत्राधिकारी प्रमोद वाढे यांना दिली. श्री. वाढे यांनी क्षेत्र सहायक जी. एस. कावळे, वनरक्षक के. एल. ठाकरे, वन्यजीव विभागाचे श्री. फाटे, बोरधरणचे वनपरिक्षेत्राधिकारी श्री. गायनेर आदींना सोबत घेऊन घटनास्थळ गाठले. नाल्यात हा बिबट निपचित पडल्याचे दिसून आले. त्यानंतर ही माहिती पिपरी (मेघे) येथील पीपल्स फॉर एनिमल्सचे आशीष गोस्वामी, कौस्तुभ गावंडे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जोगे व डॉ. ब्राह्मणकर यांना देण्यात आली. वर्ध्यातून हे पथक पिंजरा घेऊन घटनास्थळावर पोहोचल्यानंतर बिबट्याला ताब्यात घेण्यात आले. सकाळी साडेअकराच्या सुमारास जिल्हा पशुचिकित्सा केंद्रात डॉ. ब्राह्मणकर व डॉ. जोगे यांनी त्याच्यावर उपचार केले. मादी बिबट अंदाजे सात वर्षांचा असून अंगावर कुठेही जखमा नाहीत. शिकार न मिळाल्याने अशक्तपणा आला असावा. त्यामुळेच नाल्यात आडोसा घेतल्याची शक्‍यता आहे, असे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. बिबट्याला सलाईन दिल्याने त्याच्यात चपळता आली. त्याला करुणाश्रमात ठेवण्यात आले असून, त्याच्या सर्व हालचालींवर गावंडे व अन्य सहकारी नजर ठेवून आहेत. वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांनी सौरऊर्जेवर चालणारे कुंपण लावले. यातूनच ही घटना घडल्याच्या चर्चेला आज दिवसभर उधाण आले होते. 

आज रक्तचाचणी 
पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी बिबट्याला सलाईन दिल्याने प्रकृती सुधारली. शरीरातील सर्व अवयव निरोगी आहेत किंवा नाही, यासाठी उद्या, शनिवारी (ता. 24) सकाळी रक्ताची चाचणी करण्यात येणार आहे. चाचणी सकारात्मक आल्यास बिबट्याला बोर अभयारण्यात सोडण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे हिंगणीचे वनपरिक्षेत्राधिकारी प्रमोद वाढे यांनी सांगितले. 

भक्ष्य टिपण्यासाठी बिबट बऱ्याचदा सुस्तावस्थेत पडून राहतो. भक्ष्य जवळ आला की, झेप घेऊन त्यावर तुटून पडतो. त्यामुळे बिबट्याला ताब्यात घेण्यासाठी मोठा धोका पत्करावा लागतो. घटनास्थळावर पोहोचल्यानंतर सर्व लक्षणे पाहूनच पिंजऱ्यात टाकण्याची मोहीम पूर्ण करण्यात आली. 
- कौस्तुभ गावंडे, करुणाश्रम, पिपरी (मेघे) 

Web Title: seven-month custody leopard