पीककर्जासाठी शरीरसुखाची मागणी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

दाताळा (बुलडाणा) - पीककर्ज मंजूर करून देण्यासाठी शेतकऱ्याच्या पत्नीकडे चक्क शरीरसुखाची मागणी करणाऱ्या सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाच्या शाखाधिकाऱ्यावर पोलिसांनी गुरुवारी रात्री गुन्हा दाखल केला असून, हा आरोपी फरार झाला आहे.

दाताळा (बुलडाणा) - पीककर्ज मंजूर करून देण्यासाठी शेतकऱ्याच्या पत्नीकडे चक्क शरीरसुखाची मागणी करणाऱ्या सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाच्या शाखाधिकाऱ्यावर पोलिसांनी गुरुवारी रात्री गुन्हा दाखल केला असून, हा आरोपी फरार झाला आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील दाताळा या मलकापूर तालुक्‍यातील गावातील शेतकरी त्याच्या पत्नीसोबत पीककर्जासाठी गुरुवारी येथील सेंट्रल बॅंकेत गेला. कागदपत्रांची चाळणी करून तुमचा मोबाईल नंबर द्या, अशी सूचना बॅंक व्यवस्थापकाने केली. संबंधित शेतकऱ्याने त्याच्या पत्नीचा मोबाईल नंबर दिला. त्यावर शाखाधिकाऱ्याने अश्‍लिल संभाषण करून शरीरसुखाची मागणी केली. शरीरसुख मिळाल्यास मोबदल्यात पीककर्जासोबत वेगळे पॅकेज देईन, असा निरोप शिपायामार्फत महिलेला पाठविला. संबंधित महिलेने बॅंक व्यवस्थापकाशी झालेल्या संवादाचे रेकॉर्डींग करून मलकापूर ग्रामीण पोलिसात तक्रार नोंदविली.

त्याअनुषंगाने पोलिस निरीक्षक बी. आर. गावंडे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात तपासचक्रे फिरविली. चौकशी अंती गुरुवारी रात्री महिलेच्या तक्रारीवरून सेंट्रल बॅंकेचे शाखाधिकारी राजेश हिवसे व शिपाई मनोज चव्हाण या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला.

तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेता आरोपीचा शोध घेणे सुरू आहे. लवकरच आरोपी जेरबंद करू.
- गिरीश बोबडे, उपविभागीय पोलिस अधिकारी

Web Title: sex demand for crop debt waiver crime