पंचशिलातील हुतात्मा आनंद अनंतात विलीन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

नियंत्रण रेषेजवळच बंदीपूर जिल्ह्यातील गुरेझ सेक्टरमध्ये हिमस्खलनाच्या एक घटनेत मूर्तिजापूर तालुक्यातील माना येथील जवान संजय सुनील खंडारे (२७) व वाशीम बायपास परिसरातील पंचशीलनगर येथील आनंद शत्रुघ्न गवई (२६) यांना वीरगती प्राप्त झाली.

अकोला : काश्मीरमधील गुरेझ सेक्टरमध्ये झालेल्या हिमस्खलनात हुतात्मा झालेल्या आनंद गवई यांच्यावर बुधवारी येथील मोर्णे नदीच्या काठी असलेल्या स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहरातील हजारो नागरिकांनी आनंदला श्रद्धांजली वाहिली. 

नियंत्रण रेषेजवळच बंदीपूर जिल्ह्यातील गुरेझ सेक्टरमध्ये हिमस्खलनाच्या एक घटनेत मूर्तिजापूर तालुक्यातील माना येथील जवान संजय सुनील खंडारे (२७) व वाशीम बायपास परिसरातील पंचशीलनगर येथील आनंद शत्रुघ्न गवई (२६) यांना वीरगती प्राप्त झाली. वीरगती प्राप्त जवानांचे पार्थिव गुरेझ सेक्टरमधून सुखरूप काढण्यात लष्कराला यश आले होते.

श्रीनगरहून विशेष विमानाने जवानांचे पार्थिव विमानाने आधी नागपूर व त्यानंतर मंगळवारी रात्री अकोल्यात आणण्यात आले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शवविच्छेदनगृहातील शीतपेट्यांमध्ये दोन्ही जवानांचे शव ठेवण्यात आले. बुधवारी सकाळी पंचशीलनगरातील गवई कुटुंबीयांना हुतात्मा आनंदचे शव सोपविण्यात आले. याठिकाणी धार्मिक विधी करण्यात आला. त्यानंतर मोर्णेच्या काठावरील स्मशानभूमीत आनंदचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले. या ठिकाणी 11 वाजता पोलिस दल व लष्कराच्या जवानांनी हुतात्मा आनंद गवई यांना सलामी दिली. त्यानंतर शासकीय इतमामात हुतात्मा आनंदवर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

मान्यवरांनी वाहिली आदरांजली
जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई वाघोडे, आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा पोलिस अधिक्षक चंद्रकिशोर मिणा, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष गुलाबराव गावंडे, माजी आमदार हरीदास भदे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई, माजी आमदार लक्ष्मणराव तायडे यांच्यासह विविध पक्ष व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आदरांजली वाहिली. 
 

Web Title: shahid anand gawai