मूर्तिजापूर : आज (ता. 23) सकाळी यवतमाळला जाण्यासाठी सज्ज असलेल्या 'शकुंतला' रेल्वेच्या चारपैकी एका बोगीने काल मध्यरात्रीदरम्यान पेट घेतला. पहाटे साडेतीनपर्यंत आगीचे डोंब उसळत राहिले आणि बोगी बेचीराख झाली.
येथील रेल्वे स्थानक जंक्शन आहे. येथून अचलपूर-मूर्तिजापूर-यवतमाळ दरम्यान मिटरगेज रुळावरून चार डब्यांची गाडी दिवसाकाठी एक फेरी मारते. शकुंतला नावाने ओळखल्या जाणाऱ्या व अद्याप ब्रिटीश क्लीक अँड निक्सन कंपनीच्या ताब्यात असणाऱ्या या गाडीची यवतमाळ कडील फेरी सध्या बंद आहे. अचलपूरकडे मात्र 'शकुंतला' रोज सकाळी साडेसातला जाते. आजही सकाळी नियोजित वेळेवर निघण्यासाठी सज्ज होऊन ती चार नंबरच्या प्लॅटफॉर्मवर उभी होती. चारही डबे सज्ज असताना त्यापैकी गार्ड डब्याला काल मध्यरात्रीदरम्यान आग लागली.
ही बर्निंग बोगी विझविण्यासाठी रेल्वे रूळ आणि खड्ड्यांचा अडथळा पार करून पोचणे अग्निशमन बंबाला शक्य झाले नाही. अखेर बोगी धगधगत राहीली. पहाटै साडेतीनच्या दरम्यान आग विझली, पण बोगीचा घास घेऊन. 'शकुंतले'चा गार्ड डबा जळून खाक झाला. जिवीतहानी झाली नाही, मात्र रेल्वेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. आज सकाळी साडेसातची अचलपूरची 'शकुंतले'ची फेरीही रद्द झाली.
आगीचे कारण समजू शकले नाही. संबंधित अधिकारी येतील. समिती गठीत होईल व नंतर चौकशीअंती आगीचे कारण कळू शकेल.
- नरवाडे, स्थानक व्यवस्थापक.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.