शामाप्रसाद मुखर्जी ग्रंथालयाचे हाल "बेहाल' 

राघवेंद्र टोकेकर
शनिवार, 23 जून 2018

नागपूर : भारतीय जनसंघाचे संस्थापक शामाप्रसाद मुखर्जी यांच्या नावे असलेल्या वास्तूचे संघाचे मुख्यालय असलेल्या शहरातच हाल "बेहाल' झाले आहे. विशेष म्हणजे ही वास्तू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवसस्थानासमोरच आहे. 

नागपूर : भारतीय जनसंघाचे संस्थापक शामाप्रसाद मुखर्जी यांच्या नावे असलेल्या वास्तूचे संघाचे मुख्यालय असलेल्या शहरातच हाल "बेहाल' झाले आहे. विशेष म्हणजे ही वास्तू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवसस्थानासमोरच आहे. 

धरमपेठ भागातील त्रिकोणी पार्क येथील महानगरपालिकेच्या वाचनालयाला शामाप्रसाद मुखर्जी यांचे नाव देण्यात आले आहे. वाचनालयाची जबाबदारी 2015 साली गांधी स्मारक निधी या संस्थेकडे सोपविण्यात आली. मात्र, त्यानंतर धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मनपाच्या अधिकाऱ्यांनी हवे तसे सहकार्य केले नाही. त्यामुळे समस्या उद्भवल्याची माहिती संस्थेचे सचिव सुनील पाटील यांनी दिली. येथे तीन हजार पुस्तकांचा संचय असला तरी तो 2015 च्या आधीचा आहे. त्यानंतर पुस्तक खरेदीच झालेली नाही. त्यामुळे नागरिकांना वाचनाचा आनंद घेता येईल असे तेथे काही नाही. या भागातील 75 ज्येष्ठ नागरिक त्याचे आजीवन सदस्य आहेत. मात्र, स्थापनेपासून वाचनालयातील साधनांची देखभाल झाली नसल्याचे जाणवते. येथे पिण्याचे पाणी नाही, महिलांसाठी असलेले स्वच्छतागृह जीर्णावस्थेत आहे. नादुरुस्त संगणक धूळखात पडला आहे. येथे गेल्यावर वाचनालय आहे की, कचराघर असा प्रश्‍न पडतो. येथील शामाप्रसाद मुखर्जींच्या पुतळ्याचे पोपडे पडण्यास सुरुवात झाली आहे. 

मी स्वत: या स्थळाला भेट देऊन पाहणी करते आणि स्वच्छतेच्या संदर्भातल्या सगळ्या सूचना देते. लोकांनी तेथे कचरा टाकला आहे. त्यांच्यावरही कारवाईच्या दृष्टीने निर्णय घेते. 
- रूपा रॉय, सभापती, धरमपेठ झोन 

इमारतीच्या आतील मालमत्तेची देखभाल महापालिकेतर्फे दिल्या जाणाऱ्या तुटपुंज्या निधीतून करणे अवघड आहे. वाचकांना चांगल्यातले चांगले देण्याचा प्रयत्न असून, धोरणात्मक निर्णय आडवे येत आहेत. 
- सुनील पाटील, सचिव, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी संस्था 
 

Web Title: Shamaprasad Mukherjee's Library in bad condition