शरद बोबडे यांचा नागपूरकर करणार जंगी सत्कार

शरद बोबडे यांचा नागपूरकर करणार जंगी सत्कार

नागपूर : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सरन्यायाधीशपदासाठी मराठी व्यक्तिमत्त्व आणि नागपूरचे सुपुत्र असलेले न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असून ते 18 नोव्हेंबरला आपल्या पदाची शपथ घेणार आहे. यामुळे, विधी क्षेत्रातील व्यक्तींसह नागपूरकरांची छाती अभिमानाने उंचावली आहे. देशाचे 47 वे सरन्यायाधीश म्हणून पदग्रहण करणारे शरद बोबडे यापदी विराजमान होणारे नागपुरातील दुसरे आहेत. 
1968 मध्ये मुहम्मद हिदयतुल्लांच्या रूपाने शहराला हा मान पहिल्यांदा मिळाला होता. न्यायमूर्ती बाबेडे यांच्या सरन्यायाधीशपदी झालेल्या निवडीबद्दल नोव्हेंबर अखेरीस हायकोर्ट बार असोसिएशने जंगी कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे नियोजन केले आहे. अर्थातच, बोबडे यांच्या व्यस्त तारखांचा विचार करूनच कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. दिल्ली येथे होणाऱ्या पदग्रहण सोहळ्याला उपस्थित राहण्याकरिता विधी क्षेत्रातील अनेक मान्यवर जाण्याची तयारी करीत आहेत. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव मोजक्‍या लोकांना या सोहळ्याला प्रवेश दिला जाण्याची शक्‍यता आहे. देशाच्या सर्वोच्च पदापैकी एक असलेल्या सरन्यायाधीशपदासाठी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांच्या नावाची शिफारस केली आहे. 
न्यायमूर्ती शरद बोबडे नागपूर खंडपीठामध्ये वकिली करताना खूप हुशार व्यक्ती म्हणून ओळखले जायचे. मुद्दे टिपून योग्य पद्धतीने न्यायालयात मांडण्यात त्यांचा हातखंडा होता. लाखांवर शेतकऱ्यांची न्यायालयामध्ये त्यांनी मांडलेली बाजू आणि प्रसिद्ध अभिनेत्री हेमामालिनीचा लढलेल्या खटल्यामुळे ते चर्चेत आले होते. इंग्रजी सोबतच संस्कृत आणि वेदांवर त्यांचे प्रभुत्व आहे. विद्यापीठाकडून टेनिस खेळताना त्यांनी टेनिसचे "कोर्ट'सुद्धा गाजवले आहे. यासोबतच, त्यांना वाईल्ड लाइफ फोटोग्राफीची आवड आहे. नागपूरमध्ये असताना सुट्ट्यांच्या काळामध्ये विविध अभयारण्यामध्ये ते जंगल सफारीसाठी जात असे. त्यांनी न्यायाधीश म्हणून एक वर्ष नागपूर खंडपीठात आपली सेवा दिली आहे. 
घरातूनच वकिली व्यवसायाचे बाळकडू 
न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांचा जन्म 24 एप्रिल 1956 रोजी नागपूरमध्ये झाला. वडील अरविंद बोबडे हे महाराष्ट्राचे महाविधिवक्ता होते. थोरले बंधू विनोद बोबडे हे सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ विधिज्ञ होते. त्यामुळे, त्यांना आपल्या घरातूनच वकिली व्यवसायासाठी बाळकडू मिळाले. त्यांनी सत्तरच्या दशकामध्ये आपले महाविद्यालयीन शिक्षण शहरातील सेन्ट फ्रान्सीस दी सेल्स हायस्कूल (एसएफएस) मधून पूर्ण केले. विधी शाखेची पदवी 1978 साली घेत सनद मिळवीली. त्यानंतर, त्यांनी आपला वकिली शहरामध्ये व्यवसाय सुरू केला. 1998 साली वरिष्ठ विधिज्ञ आणि 29 मार्च 2000 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तिपदी ते विराजमान झाले. त्यानंतर, त्यांनी मागे वळून पाहिले नाही. पुढे ऑक्‍टोबर 2012 साली ते मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती झाले आणि एप्रिल 2013 साली सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com