Video : सरन्यायाधीश शरद बोबडे म्हणाले, अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीत तंत्रज्ञानाचा उपयोग

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 15 December 2019

हायकोर्ट बार असोसिएशन(एचसीबीए) तर्फे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरन्यायाधीश शरद बोबडेंच्या हस्ते "पोयम इन स्टोन' या नागपूर खंडपीठाच्या इमारतीचा इतिहास दर्शविणाऱ्या फलकांचे उद्‌घाटन करण्यात आले. 

नागपूर : आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर न्यायालयीन प्रक्रियेमध्ये व्हायला हवा. यामुळे न्यायालयाचा वेळ वाचत असून कामकाज सुकर होते. मात्र, न्यायदानामध्ये तंत्रज्ञानाचा समावेश व्हायला नको. कारण, निर्णय क्षमता ही तंत्रावर अवलंबून नसते. असे झाल्यास तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठामध्ये केवळ एक संगणक पाहायला मिळेल. अयोध्या प्रकरणावर सुनावणी करताना हजारो पानांचे कागदपत्र, अनेक साक्षीदार होते. यावेळी न्यायालयीन प्रक्रियेमधील आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठा उपयोग झाला, असे मत सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी व्यक्त केले. 

हायकोर्ट बार असोसिएशन(एचसीबीए) तर्फे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. माजी सरन्यायाधीश राजेंद्र लोढा यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे त्याचे स्वरूप होते. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई, नागपूर खंडपीठाचे मुख्य न्यायमूर्ती रवी देशपांडे, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, हायकोर्ट बार असोसिएशनच्या अध्यक्षा गौरी व्यंकटरमण, सचिव प्रफुल्ल खुबाळकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरन्यायाधीश शरद बोबडेंच्या हस्ते "पोयम इन स्टोन' या नागपूर खंडपीठाच्या इमारतीचा इतिहास दर्शविणाऱ्या फलकांचे उद्‌घाटन करण्यात आले. 

सरन्यायाधीश शरद बोबडे म्हणाले, नागपूर शहरात माझी पाळेमुळे जुळली आहेत. माझी वकिली, माझ्या कारकिर्दीची सुरुवात या शहरातून झाली आहे. अशा पदावर जाणाऱ्या माणसाच्या आयुष्यामध्ये असे अनेक प्रसंग येतात. अनेक पायऱ्या सर करीत तो व्यक्ती यशस्वी होतो. त्या व्यक्तीला नशीबवान म्हटल्या जाते. मी स्वत:ला खरेच नशीबवान समजतो. मात्र, हा सन्मान मला नागपूरकरांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादामुळे मिळाला आहे. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये मध्यस्थाची भूमिका महत्वाची असते. त्यामुळे, मुंबई आणि नागपूर विद्यापीठाला मी मध्यस्थी अभ्यासक्रम सुरु करण्याची विनंती केली आहे.

Image may contain: 7 people, people smiling, people standing and suit
हायकोर्ट बार असोसिएशनतर्फे सत्कार सोहळ्याची शानदार तयारी करण्यात आली होती. यादरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या इमारतीला शेकडो दिव्यांनी सजविण्यात आले होते. आकर्षक दिसणारी इमारत रस्त्यावरील जाणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे लक्ष वेधत होती. 

माजी सरन्यायाधीश राजेंद्र लोढा म्हणाले, 1994 साली मी सरन्यायाधीश शरद बोबडे यांना वकिली करताना पाहिले आहे. त्याची विधी क्षेत्रातील बुद्धिमत्ता आणि जीवन उल्लेख करण्यासारखे आहे. त्यांना या क्षेत्राची चांगली समज आहे. बार हा खंडपीठाचा छोटा मार्गदर्शक असतो. वकिलांनी प्रकरणाची योग्य मांडणी केल्याशिवाय न्यायाधीश निकाल देऊ शकत नाही. याबाबत सरन्यायाधीश बोबडे यांचे सादरीकरण उत्कृष्ट असायचे. नागपूर शहरातर्फे हायकोर्ट बार असोसिएशनने केलेला सत्कार हा सरन्यायाधीश बोबडेंच्या आईने केलेला सत्कार आहे, असेच म्हणायला हवे. 

मुख्य न्यायमूर्ती भूषण बोबडे म्हणाले, आज मी हा सोहळा न्यायमूर्ती म्हणून नाही तर बार असोसिएशनचा सदस्य म्हणूनच अनुभवतो आहे. आपल्यातील एक सहकारी या पदापर्यंत पोहोचत असल्यास प्रत्येक बारला त्याचा हेवाच वाटेल. सरन्यायाधीश शरद बोबडे कार्यतत्पर आहेत. त्यांनी शपथ घेतल्या घेतल्या कामाला सुरुवात केली. त्यांनी विविध समित्या नेमल्या, प्रलंबित प्रकरणावर जलदगतीने सुनावणी कशी होइल, यावर पावले उचलले. न्यायालयीन कामकाजातील तंत्रज्ञानामध्ये आधुनिकता आणली व कर्मचाऱ्यांची संख्यासुद्धा वाढविली. 

Image may contain: 9 people, people smiling, people standing and suit
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या इमारतीचा समावेश वारसास्थळामध्ये होतो. या वारस्याचे महत्त्व दर्शविणाऱ्या "पोयम इन स्टोन' फलकाचे अनावरण सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माहिती देताना नागपूर खंडपीठाचे मुख्य न्यायमूर्ती रवी देशपांडे, न्यायमूर्ती सुनील शुक्रे. 

तत्पूर्वी, सरस्वती स्तवन सादर करण्यात आले. गायकांना ऍड. अजित पाध्ये (हार्मोनियम), ऍड. भानुदास कुलकर्णी (तबला) यांनी साथ दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एचसीबीएच्या अध्यक्षा ऍड. गौरी व्यंकटरमण यांनी आणि आभार सचिव ऍड. प्रफुल्ल खुबाळकर यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड. वर्षा देशपांडे, ऍड. राधिका बजाज यांनी केले. 

Image may contain: 8 people, people smiling, people standing
कार्यक्रमामध्ये सकाळ प्रकाशनाच्या न्यायनिवारा या पुस्तकांसह विधी क्षेत्रातील काही पुस्तकांचा प्रकाशन सोहळा पार पडला. या पुस्तकांसोबतच "पिनॅकल' या स्मरणिकेचेसुद्धा मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. 

मान्यवरांची उपस्थिती

सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला विधी क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये, न्यायमूर्ती श्रीराम मोडक, न्यायमूर्ती सुनील शुक्रे, न्यायमूर्ती झेड. ए. हक, न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी, न्यायमूर्ती मिलिंद जाधव, न्यायमूर्ती भारती डांगरे, पोलिस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय, राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्यासह मुंबई, नागपूर, औरंगाबाद आणि गोवा येथील न्यायमूर्ती व वकिलांचा समावेश होता. 

No photo description available.

'सकाळ'च्या न्यायनिवाराचे प्रकाशन

कार्यक्रमामध्ये मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेचे, दशोपनिशद या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी "सकाळ प्रकाशन'तर्फे ऍड. स्मिता सरोदे-सिंगलकर लिखित "न्यायनिवारा' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळासुद्धा पार पडला. या पुस्तकाला सरन्यायाधीश शरद बोबडे यांची प्रस्तावना लाभली आहे. या पुस्तकामधील संकलित लेख जानेवारी 2010 ते डिसेंबर 2010 या कालावधीमध्ये "दै. सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Bobde felicitated