शरद पवार यांचा सवाल, कुठल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

नागपूर : पन्नास हजार कोटींची मदत शेतकऱ्यांना केली असा दावा सरकारतर्फे केला जात असून मुख्यमंत्र्यांनी कुठल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले हे सांगावे, असा सवाल करून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भूलथापा देणारे, जनतेची दिशाभूल करणारे सरकार उलथवून टाका, असे आवाहन मतदारांना केले. 

नागपूर : पन्नास हजार कोटींची मदत शेतकऱ्यांना केली असा दावा सरकारतर्फे केला जात असून मुख्यमंत्र्यांनी कुठल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले हे सांगावे, असा सवाल करून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भूलथापा देणारे, जनतेची दिशाभूल करणारे सरकार उलथवून टाका, असे आवाहन मतदारांना केले. 
हिंगणा आणि काटोल येथील कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पवार यांनी बुटीबोरी आणि काटोल शहरात जाहीर सभा घेतल्या. यावेळी त्यांनी राज्य व केंद्र सरकारचा खरपूस समाचार घेतला. शेतकऱ्यांना 50 हजार कोटींची मदत सरकारने केली असती तर आज शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या नसत्या. संपूर्ण कर्जमाफी ही बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी आहे. दिशाभूल करणे, फसगत करणे, वेळ मारून नेणाऱ्या भाजप-सेना युतीच्या सरकारला धडा शिकवा, असेही पवार म्हणाले. 
सरकारचे नियोजन फसले 
एकीकडे मंदी आणि दुसरीकडे महागाई असा विचित्र प्रकार देशात सुरू आहे. फसलेल्या नियोजनामुळेच असे प्रथमच घडत आहे. मंदीतून सावरण्यासाठी कारखान्यांना बळ देऊन रोजगार वाचविले पाहिजे, उद्योगांना बूस्ट दिला पाहिजे हे सोडून सरकार मंदी असल्याचे सांगून देशाला सावरण्याऐवजी हातावर हात ठेवून बसले असल्याची टीकाही पवार यांनी केली. 
सत्तेचा गैरवापर 
ईडी आणि पोलिस कारवाईचा धाक दाखवून भाजप सत्तेचा गैरवापर करीत आहेत. कोणालाही तुरुंगात टाकले जात आहे. ज्या बॅंकेचा मी संचालक नाही, साधा सदस्य नाही, कुठलाही व्यवहार केला नाही असे असताना आपल्यावर गुन्हे दाखल केले. ईडीने नोटीस बजावली. माझ्यासारख्यांवर एवढा सूड उगवला जात असेल तर सर्वसामान्यांना कसे वागवतील याचा विचार मतदारांनी करावा. 
स्मारकांची कामे शून्य 
अरबी समुद्रात छत्रपतींचे स्मारक उभारले जाणार होते. पंतप्रधानांच्या हस्ते जलपूजन केले. इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेब आंबेडकरांचेही स्मारक उभारले जाणार होते. एवढेच नव्हे तर अण्णा भाऊ साठेंचे स्मारक उभारण्याचीही घोषणा भाजपने केली होती. पाच वर्षे झाले सर्व स्मारकांची कामे शून्य आहेत. फक्त राजकीय हित डोळ्यासमोर ठेवून घोषणा करणारे हे सरकार असल्याची टीकाही यावेळी शरद पवार यांनी केली. 
"पुलवामा'चा राजकीय फायदा घेतला 
इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानला पराभूत केले, बांगलादेशची निर्मिती केली, मात्र याचा राजकीय फायदा घेतला नाही. मात्र, पुलवामा घटनेचा राजकीय फायदा भाजप घेत आहे. तो प्रचाराचा प्रमुख केला आहे. काश्‍मीरचे 370 कमल रद्द केले. त्याचे ढोल बडवल्या जात आहे. मात्र मणिपूर, नागालॅंड येथील विशेष कलम रद्द करण्याची मोदी यांनी आता हिम्मत दाखवावी, असे आव्हानच त्यांनी दिले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sharad pawar, election, farmer, debt