‘शार्पशूटर’ शेखूला सहारा सिटीतून अटक

Sharpshooter
Sharpshooter

नागपूर - पिस्तूल आणि बुलेट तस्करीत मोठे नाव असलेला ‘शार्पशूटर’ शेखू ऊर्फ गुलनवाज एजाज खान (वय ३१, उत्थाननगर) याला दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) आज पहाटेच्या सुमारास नागपुरातील वर्धा रोडवरील सहारा सिटीतून अटक केली. या कारवाईमुळे कोळसा माफिया, दारू तस्कर आणि शस्त्र तस्कर करणाऱ्या टोळ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. 

शेखू खान हा बिहार, उत्तर प्रदेशातून पिस्तूल आणि बुलेट्‌स आणून चंद्रपूर, नागपूर येथील काही गुंडांना पुरवीत असल्याची माहिती एटीएसला मिळाली. त्यामुळे एटीएस शेखूच्या मागावर होते. मात्र, चलाख शेखू पोलिसांच्या रडारवर येत नव्हता. शेवटी शेखू सहारा सिटीमधील एका फ्लॅटमध्ये मोठ्या शस्त्रसाठ्यासह लपून बसल्याची टिप एटीएसला मिळाली. आज बुधवारी पहाटेच्या सुमारास एटीएसने घेराबंदी करून सापळा रचला. फ्लॅटमध्ये एकटाच असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. फ्लॅटची झडती घेण्यात आली. मात्र, तेथून शस्त्र मिळून आले नाही.  

शेखूने काही साथीदारांच्या मदतीने २०१३ मध्ये भाजपचा शहर उपाध्यक्ष हेमंत दियेवार याचा शंकरनगर चौकात गोळ्या घालून खून केला होता. तेव्हापासून शेखू चर्चेत आला होता. त्यानंतर तो चंद्रपुरातील घुग्घुस येथील हाजी शेख याच्या टोळीत सामील झाला. शेखूने खाणीतून कोळसा चोरून तो तस्करी करण्याचा सपाटा सुरू केला. त्याने कोळखा विक्रीतून लाखो रुपये कमावले. त्यानंतर त्याने मध्य प्रदेशातून बनावट दारू आणून दारूबंदी जिल्हा चंद्रपूर आणि नागपुरात सप्लाय करण्यास सुरवात केली. दारू तस्करीत त्याने मोठा जम बसविला. नागपुरातील जवळपास ८० टक्‍के बारमध्ये शेखूची बनावट दारू पोहोचत आहे. त्यासाठी त्याने लाखो रुपये खर्च करून मोठी साखळी तयार केली आहे. त्यासाठी चंद्रपूर आणि नागपुरात युवकांची मोठी फौज नियुक्‍ती केली आहे. उमरेड रोडवरील एका ढाबामालकाशी भागीदारी करून ग्रामीण भागातील जवळपास ९० टक्‍के ढाब्यावर बनावट दारू पोहोचविण्याचे काम सुरू केले आहे.

म्हणून आला एटीएसच्या रडारवर
शेखूने दारू तस्करी आणि कोळसा तस्करीतून बक्‍कळ पैसा कमविल्यानंतर शस्त्र तस्करीकडे वळला. त्याने बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांतून पिस्तूल आणि काडतुसे आणून चंद्रपूर, नागपूरसह अन्य जिल्ह्यांत विक्रीस सुरुवात केली. त्यामुळे तो एटीएसच्या रडारवर आल्याची माहिती आहे. बिहारमधील दोन गुंडांच्या मदतीने तो शस्त्र तस्करी करीत होता. त्याने काही महिन्यांपूर्वीच अमरावती रोडवरील एका मोठ्या हॉटेलमध्ये चंद्रपूर आणि नागपुरातील दिग्गज गुंडांसाठी पार्टीचे आयोजन केले होते. पार्टीसाठी मुंबई-दिल्लीतील डान्सर युवतींना बोलाविण्यात आले होते. लाहोरी बारमध्ये केलेल्या फायरिंगमध्येही त्याचे नाव चर्चित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com