बचतगटांचे कर्ज माफ करा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 डिसेंबर 2016

नागपूर - राज्यातील महिला बचतगट व शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज सरसकट माफ करावे, या मागणीसाठी आम आदमी पक्षाच्या मोर्चाने शुक्रवारी विधानभवनावर धडक दिली. यासह विविध संस्था, संघटनांच्या तब्बल 16 मोर्चांनी आज विधानभवन परिसर दणाणून सोडला.

नागपूर - राज्यातील महिला बचतगट व शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज सरसकट माफ करावे, या मागणीसाठी आम आदमी पक्षाच्या मोर्चाने शुक्रवारी विधानभवनावर धडक दिली. यासह विविध संस्था, संघटनांच्या तब्बल 16 मोर्चांनी आज विधानभवन परिसर दणाणून सोडला.

बचतगटांच्या महिला मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. "बचतगटांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे', "बंद करा कर्ज वसुलीची सक्ती, शासनाला द्यावी लागेल कर्जमुक्ती' आदी घोषणा देत महिलांनी यशवंत स्टेडीयम येथून विधानभवनाच्या दिशेने आगेकूच केली. मॉरिस कॉलेज टी पॉइंट येथे मोर्चाला रोखून धरण्यात आले. वित्त संस्थांकडून कर्ज वसुलीसाठी होणारी बळजबरी थांबवावी. मायक्रो फायनान्स कंपन्यांसह बॅंकांकडून घेतलेले कर्ज माफ करण्यात यावे. कर्जमाफीचे अर्ज स्वीकारण्यासाठी एक खिडकी योजनेची व्यवस्था करावी. भविष्यात गटांना बिनव्याजी कर्ज द्यावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वित्तसंस्थावर कारवाई करावी. स्वामिनाथन आयोग लागू करा. कापसाला 7 हजार, सोयाबीनला 5हजार व धानाला 3 हजारांचा भाव दिला जावा, आदी मोर्चेकऱ्यांच्या मागण्या आहेत. मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या जोखाडातून महिलांना मुक्त करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असून कर्जमाफीच्या विषयावर मुख्यमंत्री व महसूलमंत्र्यांशी चर्चा करण्याची ग्वाही बावनकुळे यांनी दिली. आपचे विदर्भ समन्वयक डॉ. देवेंद्र वानखेडे, डॉ. अलिम पटेल, जगजित सिंग, कविता कन्हेरे आदींनी मोर्चाचे नेतृत्व केले.

लहुजी साळवे मातंग आयोगाची अंमलबजावणी करा
आद्यक्रांतिगुरू वीर वस्ताद लहुजी साळवे मातंग आयोगाच्या सर्व शिफारशींची तत्काळ अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागणीसाठी विदर्भ लहुजी सेनेच्या मोर्चाने आज विधानभवनावर धडक दिली.

साहित्य भूषण अण्णा भाऊ साठे मंडळाला 500 कोटींचा निधी देऊन कर्ज वाटप सुरू करावे, ऍट्रॉसिटी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी, मातंग समाजातील 5 हजार विद्यार्थ्यांना प्रसिद्ध शाळांमध्ये प्रवेश देण्यात यावा, विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणापर्यंत खर्च शासनाने उचलावा, प्रत्येक मातंग वस्तीत अण्णा भाऊ साठे भवन बांधून देण्यात यावे आदी मोर्चेकऱ्यांच्या मागण्या आहेत. विदर्भ लहुजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष मेजर महादेव खंडारे, विदर्भ प्रदेश कार्याध्यक्ष लहानूजी इंगळे, राजा वैरागर, श्रीराम हंगरे, विजय जोधळेकर, एन. जी. गायकवाड, देवीदास गायकवाड, रमेश अवचारे आदींनी मोर्चाचे नेतृत्व केले.

Web Title: SHG loans