esakal | शिल्पग्राम प्रशिक्षण केंद्र दोन वर्षापासून कुलूपबंद! वाचा काय आहे कारण
sakal

बोलून बातमी शोधा

shilpgram.j

आदिवासी तरुणांना प्रशिक्षित करून त्यांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा वन विभागाचा मानस होता. परंतु लाभार्थी मिळत नसल्याने मागील दोन वर्षापासून शिल्पग्राम कुलूपबंद अवस्थेत असून येथील सौंदयीकरणाचेही काम रखडले आहे.

शिल्पग्राम प्रशिक्षण केंद्र दोन वर्षापासून कुलूपबंद! वाचा काय आहे कारण

sakal_logo
By
सुरेश नगराळे

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या लाकूड, बांबू, टेराकोटा, मेटल काष्ठ याचा वापर करून आदिवासी युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या हेतूने वनविभागाने गडचिरोलीत शिल्पग्रामची निर्मिती केली. यासाठी लाखोंचा खर्च केला. मात्र, प्रशिक्षणासाठी लाभार्थी मिळत नसल्याने मागील दोन वर्षापासून ते कुलूपबंद अवस्थेत आहे.

गडचिरोली वन वृत्ताचे तत्कालीन मुख्य वन संरक्षक टी. एस. के. रेड्डी यांच्या संकल्पनेतून जिल्हा प्रेक्षागार मैदानालगत देखणा असा शिल्पग्रामचा परिसर तयार करण्यात आला. छत्तीसगड राज्यातील कारागिरांकडून येथे आदिवासींची कला व संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या विविध प्रकारच्या मूर्ती तयार करण्यात आल्या. आदिवासी युवकांनी लाकूड, बांबू, टेराकोटा, मेटल काष्ठ यापासून तयार केलेल्या वस्तूंना आकार देण्यासाठी मोठ्या प्रमाणात यंत्रसामुग्री सुद्धा येथे बसविण्यात आली. 100 महिलांसह 650 आदिवासींना प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले होते.

मात्र, मुख्य वन संरक्षक टी. एस. के. रेड्डी यांच्या बदलीनंतर शिल्पग्रामच्या प्रशिक्षण कार्यक्रमाला घरघर लागली. वनांवर आधारित लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी रेड्डी यांनी पुढाकार घेतला होता. जिल्ह्यातील 30 अगरबत्ती प्रकल्पही त्यांच्याच कारकीर्दीत सुरू झाले होते. त्याही प्रकल्पांची अवस्था वाईट झाली आहे. 30 पैकी चार ते पाच अगरबत्ती प्रकल्प सध्या सुरू आहेत. या प्रकल्पातून महिलांच्या हाताला काम मिळाले होते.

आदिवासी तरुणांना प्रशिक्षित करून त्यांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा वन विभागाचा मानस होता. परंतु लाभार्थी मिळत नसल्याने मागील दोन वर्षापासून शिल्पग्राम कुलूपबंद अवस्थेत असून येथील सौंदयीकरणाचेही काम रखडले आहे. वनांवर आधारित उद्योगांना चालना मिळावी यासाठी गोंडवाना विद्यापीठानेही विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्यावर भर दिला आहे. तर दुसरीकडे हस्त शिल्प कलेला प्रोत्साहन देणारे शिल्पग्राम दुर्लक्षित असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.


सविस्तर वाचा - आयुक्‍त मुंढेंना आता कोणी दिला इशारा?

प्रतिसाद नाही
हस्त कलेच्या माध्यमातून आदिवासी युवकांच्या हाताला काम मिळावे या हेतूने वन विभागाने गडचिरोलीत शिल्पग्रामची निर्मिती
केली. 2018 मध्ये 75 युवकांनी विविध प्रकारचे प्रशिक्षण पूर्ण केले. या युवकांनी वस्तू तयार करून त्याची विक्री बाजारपेठेत करावी यासाठी वन विभागाने प्रोत्साहन दिले. परंतु प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे मागील दोन वर्षापासून शिल्पग्राम येथील प्रशिक्षण बंद
आहे.
सोनल भडके, सहाय्यक वनसंरक्षक गडचिरोली.