
Shinde govt : अंगणवाडी सेविकांवर उपासमारीची वेळ; तीन महिन्यांपासून मानधन थकीत; कारण...
कोरची : आदिवासीबहुल नक्षलग्रस्त असलेल्या कोरची तालुक्यातील अंगणवाडी सेविकांचे मानधन मागील तीन महिन्यांपासून थकीत असल्यामुळे बहुतेक सेविकांना आपले संसार चालवायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मानधनाअभावी अनेकांवर उपासमारीची वेळ आली असून थकीत मानधन तत्काळ द्यावे, अशी मागणी अंगणवाडी सेविकांनी केली आहे.
कोरची तालुक्यात सध्या 145 अंगणवाडी सेविका कार्यरत असून आयुक्तालयामधून त्यांचे मानधन आले नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या माहितीनुसार अंगणवाडीसेविकांना मिळणाऱ्या मानधनामध्ये केंद्राचा व राज्याच्या वाटा असून राज्याचा निधी अजूनही प्राप्त न झाल्याने अंगणवाडी सेविकांचे मानधन थकीत राहिले आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे.
लहान बाळ, स्तनदा माता व गरोदर महिला यांची संपूर्ण माहिती मोबाईलद्वारे पुरविणे, पोषण आहारचे वाटप करणे, चिमुकल्यांना शिकविणे व मुख्य म्हणजे तालुक्यातील कुपोषित बालकांची देखरेख करून कुपोषण कमी करणे आदी कामे करून आपले कर्तव्य बजावणाऱ्या सेविकांना आपल्या हक्काच्या मानधनासाठी ताटकळावे लागत आहे.
मोबाईलचा प्रोत्साहन भत्ताही गेला परत...
दरवर्षी प्रत्येक अंगणवाडी सेविकांना मोबाईल प्रोत्साहन भत्ता देण्यात येतो. हा मोबाईल प्रोत्साहन भत्ता सहा हजार रुपये असतो. तसेच महिलांना मार्गदर्शन करून सी. बी. कार्यक्रमाकरिता सहा हजार रुपयांचा मिळतात. असा एकूनं 12 हजार रुपये भत्ता अंगणवाडी सेविकांना सरकारकडून देण्याची तरतूद आहे.
मात्र हे दोन्ही भत्ते मिळून एकूण 12 हजार रुपये रकमेपैकी केवळ 1200 रुपये प्राप्त झाले आहेत. म्हणजे 12 हजार रुपये द्यायचे असताना केवळ 1200 रुपयांवर या गरीब अंगणवाडी सेविकांची बोळवण करण्यात आली आहे. या अंगणवाडी सेविकांनी उर्वरित रकमेबद्दल विचारणा केली असात ही रक्कम परत गेल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
''अंगणवाडी सेविकांच्या मानधनामध्ये केंद्र व राज्य सरकारचा वाटा असून अजूनपर्यंत राज्य सरकारचा निधी प्राप्त न झाल्यामुळे आंगणवाडी सेविकांचे मानधन थकीत आहे. हे मानधन आयुक्तालयातून येत असून ते अजून आलेले नाही.''
-गणेश कुकडे
एकात्मिक बाल विकास अधिकारी (प्रभारी), कोरची