राजकारणात जिव्हाळ्यापेक्षा चमकेशच जास्त

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

नागपूर : उत्तर नागपुरातील कुठल्याही कार्यकर्त्याच्या आयुष्यात संकट आले की विलास फडणवीस खंबीरपणे उभे राहायचे. जिव्हाळा हा शब्द त्यांच्या स्वभावाला शंभर टक्‍के लागू पडत असे. त्यांनी नि:स्वार्थ भावनेने जरीपटक्‍यातील गरीब वस्तीत स्थान मिळवले. दुर्दैवाने आज राजकारणात चमकेश कंपनी मोठ्या प्रमाणात असून नैसर्गिक जिव्हाळा आता आर्टिफिशियल झाला असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

नागपूर : उत्तर नागपुरातील कुठल्याही कार्यकर्त्याच्या आयुष्यात संकट आले की विलास फडणवीस खंबीरपणे उभे राहायचे. जिव्हाळा हा शब्द त्यांच्या स्वभावाला शंभर टक्‍के लागू पडत असे. त्यांनी नि:स्वार्थ भावनेने जरीपटक्‍यातील गरीब वस्तीत स्थान मिळवले. दुर्दैवाने आज राजकारणात चमकेश कंपनी मोठ्या प्रमाणात असून नैसर्गिक जिव्हाळा आता आर्टिफिशियल झाला असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
दान पारमिता सामाजिक संस्थेचा जिव्हाळा पुरस्कार यंदा वेदविद्यावर्धिनी गुरुकुलमच्या विवेक पांढरीकर यांना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. विलास डांगरे होते. मंचावर आशुतोष फडणवीस, अविनाश संगवई उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, सामाजिक कार्यात नेते आणि कार्यकर्त्यांमधले अंतर एक फुटापेक्षा अधिक नको. कार्यकर्त्यांमधील जिव्हाळा पारिवारिक असला पाहिजे. कार्यकर्त्यास गुणदोषांसह स्वीकारणे हा संघटनेचा धर्म असतो. संघटनेच्या विचारधारेपेक्षा नेतृत्वाचा जिव्हाळा अधिक मोलाचा असल्याचे यावेळी नितीन गडकरी म्हणाले.
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी गडकरींच्या विचारधारेपेक्षा जिव्हाळा या वाक्‍यातील चूक सुधारतो असे सांगत, नेतृत्वाचा जिव्हाळा हीच संघाची विचारधारा असल्याचे सांगितले. आजकाल निवडणुकींमध्ये परोपकार करण्याची वृत्ती बळावली आहे. स्वार्थी माणसेच परोपकार करतात. जातीयवादाला सर्वांचाच विरोध आहे. मात्र, त्याचे आचरण कोणीच करीत नसल्याचे डॉ. भागवत म्हणाले. याप्रसंगी आशीष जोशी यांचा नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सृष्टी राऊत हिने "बेटी बचाओ, बेटी पढाओ' विषयावरील कविता सादर केली. संचालन आदिती देशमुख यांनी केले. आभार अविनाश पाचारे यांनी मानले.

संघाची विचारधारा संघटित करणारी ः भागवत
हिंदू समाजाला संघटित करणारी संघाची विचारधारा आहे. हिंदू समाज संघटित झाल्यावर तो संपूर्ण जगाला आपल्या कवेत घेईल. जे स्वत:ला हिंदू म्हणत नाहीत पण जिव्हाळ्याच्या कक्षेत येऊ पाहत आहेत त्यांच्यासाठीही कार्य करेल. विशेष म्हणजे अशा उमेदीने जगणारे अनेक लोक आपल्याकडे आहेत. मात्र, त्यांचे अदृश्‍य कार्य कोणालाही कळत नाही, असे सरसंघचालक म्हणाले.

गडकरींची कारागृहातील आठवण
आणीबाणीत मामाच्या भेटीसाठी आम्ही रात्रभर कारागृहाबाहेर बसायचो, कारागृहाचा अधीक्षक हाक द्यायचा, तेव्हा आत जाऊन मामाला भेटण्याची संधी मिळत असे. आज अनेक कारागृहांना भेटी देतो. लोक मला सॅल्यूट करतात. मात्र, तेथे गेलो की मला आणीबाणीचे दिवस आठवत असल्याचे नितीन गडकरी म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiny more than intimate in politics