शिवसैनिकांनी लगावली अधिकाऱ्याच्या कानशिलात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

नागपूर : पूर्व नागपुरातील एका शाळेत शालेय पोषण आहारात अळ्या निघाल्याची तक्रार घेऊन आलेल्या शिवसैनिकांनी जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षण विभागातील कक्ष अधिकाऱ्यास मारहाण केली. यामुळे जिल्हा परिषदेत चांगलीच खळबळ उडाली. या प्रकरणी शिक्षण विभागाकडून पोलिसात तक्रारही करण्यात आली आहे.

नागपूर : पूर्व नागपुरातील एका शाळेत शालेय पोषण आहारात अळ्या निघाल्याची तक्रार घेऊन आलेल्या शिवसैनिकांनी जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षण विभागातील कक्ष अधिकाऱ्यास मारहाण केली. यामुळे जिल्हा परिषदेत चांगलीच खळबळ उडाली. या प्रकरणी शिक्षण विभागाकडून पोलिसात तक्रारही करण्यात आली आहे.
शिवसेनेचे शहरप्रमुख व माजी खासदार प्रकाश जाधव यांच्या नेतृत्त्वात 20 ते 25 शिवसैनिकांनी दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांचे कार्यालय गाठले. त्यांना निवेदन दिले. त्यानंतर कार्यालयाचा फोन का लागत नाही, असा जाब शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांना केला. वंजारी यांनी त्याविषयी माहिती नसल्याचे सांगत कक्ष अधिकारी (शिक्षण विस्तार अधिकारी) रमेश हरडे यांना बघण्यास सांगितले. सूत्रांच्या माहितीनुसार, फोनचा वायर काढून ठेवण्यात आला होता. तो जोडताना शिवसैनिकांनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या कक्षातील सीसीटीव्हीच्या कॅमेरात बघितले. त्यामुळे संतापलेल्या शिवसैनिकांनी हरडेंना बोलावून त्यांच्या कानशिलात लगावली. या प्रकारामुळे अख्खे शिक्षण विभाग धावून शिक्षणाधिकाऱ्यांच्या कक्षाकडे आले. तेव्हा कर्मचाऱ्यांना आत येण्यासही शिवसैनिकांनी मज्जाव केल्याचे सूत्रांनी सांगितले. तक्रारीवरून सदर पोलिसांनी तिघांविरूद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करणे तसेच बेकादेशीररीत्या जमाव निर्माण केल्याप्रकरणी तीन आरोंपींविरूद्ध गुन्हे दाखल केले.
कर्मचाऱ्यांचा कामबंद आंदोलनाचा इशारा
जिल्हा परिषदेतील कर्मचारी संघटनांनी निषेध व्यक्त केला आहे. मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत लेखणीबंद आंदोलन करण्याचा इशारा संघटनांसह शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनी दिला आहे.  

पारडी परिसरातील दिनाबंधुनगर येथील जय भारत विद्यालय येथे गुरुवारी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या मध्यान्ह भोजनामध्ये अळ्या, किडे निघाले. याची तक्रार पालकांनी शिवसैनिकांकडे केली होती. या तक्रारीबाबत प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना अवगत करण्यासाठी शिवसैनिकांनी कार्यालयीन दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, फोन लागत नसल्यामुळे त्यांनी शनिवारी वंजारी यांच्या मोबाईलवरही वारंवार संपर्क साधला. प्रतिसाद न मिळाल्याने आज निवेदन सादर करण्यात आले.
- प्रकाश जाधव, शहरप्रमुख, शिवसेना

घडलेला प्रकार निंदनीय आहे. अशाप्रकारे मारहाण योग्य नाही. या प्रकरणी सदर पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.
- चिंतामण वंजारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जि. प.

Web Title: Shiv Sainiks attact the charge of the officer