शिवसेनेच्या चिंटू महाराजावर खंडणीचा गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

नागपूर : शिवसेनेचा वादग्रस्त नेता रविनीश पांडे ऊर्फ चिंटू महाराज तसेच त्याच्या सहकाऱ्यांवर वाळू ट्रकचालकाला एक लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी मौदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या "ऑडिओ क्‍लिप'ची मौदा पोलिसांनी दखल घेऊन गुन्हा दाखल केल्याचे समजते. क्‍लिपमध्ये "सेने ते तरफ परिवहन है, ट्रान्सपोर्ट है' असे ट्रक मालकास चिंटू महाराज धमकावत असल्याचे स्पष्ट ऐकायला येते.
सोमवारी पहाटे दोन ते अडीच वाजताच्या सुमारास मौदा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील माथनी टोला नाक्‍याच्या आसपास घडली. राजेश धुलीचंद वैरागडे असे या तक्रारदाराचे नाव आहे. वैरागडे यांच्या मालकीचा ट्रक हा रेती भरून भंडारा परिसरातून येत होता. हा ट्रक चिंटू महाराज आणि त्याच्या टोळीने अडविला. "चोरीची रेती नेतो आहेस, आम्हाला एक लाख रुपये अन्यथा तुझी माहिती आरटीओ किंवा पोलिसांना देतो', अशी धमकी चिंटू महाराज आणि त्याच्या साथीदारांनी या ट्रकचालकाला दिली. दरम्यान, मौदा पोलिसांचे पॅट्रोलिंग पथक या बाजूने जात होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत चिंटू महाराज आणि त्याच्या साथीदारांनी पळ काढला होता. पोलिसांनी रेतीचोरीचा ट्रक जप्त केला. मौदा पोलिसांनी या ट्रकचा मालक वैरागडे याच्यावर रेती चोरीला तर त्याच्याकडून खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चिंटू महाराज आणि त्याच्या साथीदारांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
असे प्रकार अनेक वर्षांपासून
चिंटू महाराज आणि तक्रारदार वैरागडे यांच्यातील फोनवरील संभाषण व्हायरल झाले. "अब तो परीवहन और आरटीओ विभाग भी शिवसेना के अंडर हैं' असे चिंटू महाराज फोनवरून बोलत असल्याचे स्पष्ट ऐकू येते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena Chintu Maharaja's crime of ransom