अकोला महापालिका सभागृहात शिवसेना नगरसेवकांनी फेकले मांस

shivsena
shivsena

अकोला : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी शिवसेना आणि काँग्रेस नगरसेवकांनी सत्ताधारी भाजपवर आरोप करीत चांगलाच गदारोळ केला. शिवसेना गटनेते राजेश मिश्रा यांनी उघड्यावरील मांस विक्रीच्‍या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी सभागृहातच मांस टाकले. त्यावरून काँग्रेसने आक्षेप घेतल्याने सभागृहात दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांमध्ये खडाजंगी झाली. त्यानंतरही सभागृहात सत्ताधारी भाजप व शिवसेना, काँग्रेस सदस्यांमध्ये गदारोळ सुरूच राहिल्याने महापौर अर्चना मैसने यांनी गोंधळातच सर्व विषय वाचून मंजूर केले. हा गदारोळ गुंठेवारीच्या विषयावरील चर्चा टाळण्यासाठी पूर्वनियोजित असल्याचा आरोप सभेनंतर भाजपने केला तर फोर जी केबल व टॉवर प्रकरणात मोबाईल कंपन्यांना फायदा करून देण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा कट होता. त्यामुळेच त्यांनी सभागृहाचे कामकाज गुंडाळल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते साजिद खान पठाण यांनी केला.


पौळा चौकातील रस्त्यावरच मांस विक्री करणारे मांसाचे शिल्लक तुकडे, पंख, हड्ड्या रस्त्याच्या बाजूला टाकतात. याशिवाय मांस विक्री करणाऱ्यांनी अतिक्रमण करून थेट रस्त्यापर्यंत पाल टाकले आहे. त्याचाही वाहतुकीला अडथळा होतो. या समस्येकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत शिवसेना गटनेते राजेश मिश्रा यांनी सभागृहात महापौरांच्या समोरील मोकळ्या जागेत मांस टाकून खळबळ उडवून दिली. त्यामुळे सभागृहात एकच गदारोळ झाला. महापौर अर्चना मैसने यांनी सभागृहाचे कामकाज थांबवून स्वच्छता करायला लावली. त्यानंतर पुन्हा कामकाज सुरू करण्यात आले.

शिवसेनेने या विषयावर आधी चर्चा करण्याची मागणी केली. त्यावर काँग्रेसचे गटनेते साजिद खान पठाण यांनी काँग्रेस नगरसेवकाचा महापालिका कर्मचाऱ्याने अवमान केल्याने त्या विषयावर आधी चर्चा करण्याची मागणी केली. त्यावरून शिवसेना आणि काँग्रेस नगरसेवक आमने-सामने आले. चांगलीच शाब्दिक खडाजंगी उडाली. भाजपचे सदस्य आणि माजी महापौर विजय अग्रवाल यांनी या विषयात सभागृहाचा सन्मान राखला जावा, याचे भावन सदस्यांनी ठेवण्याचा आग्रह केला. त्यावरून विरोधी पक्ष नेते व भाजप सदस्‍यांमध्येही वाद झाला. साजिद खान पठाण यांनी या विषयाला धार्मिक रंग दिला जात असल्याचा आरोप करून पुन्हा गदारोळ घालण्यास सुरुवात केली. आधी आमचा विषय घ्या, म्हणून आग्रह धरण्यात आला.

हा गदारोळ सुरू असताना महापौरांनी इतरवृत्त मंजूर केले. त्यानंतर पथदिव्यांच्या विषयावरून चर्चा सुरू असताना साजिद खान यांनी भाजपच्या एका नगरसेवकाचा फोन उचलला नाही म्हणून अधिकाऱ्यांना सभागृहात वेठीस धरले जात आहे. काँग्रेस नगरसेवकाचा अवमान झाल्यानंतरही त्याबाबत चर्चा टाळली जाते. यावरून मनपाचे प्रशासकीय प्रमुख म्हणून आयुक्तही संशयाच्या भौवऱ्यात येत असल्याचा आरोप केला. पठाण यांनी प्रशासनाला इशाराही दिला. त्यावर विजय अग्रवाल यांनी आक्षेप घेतल्याने पुन्हा गदारोळ सुरू झाला. शिवसेना, काँग्रेस व भाजपचे सदस्य महापौरांपुढे एकत्र येवून वाद घालू लागले. हा गोंधळ सुरू असतानाच महापौरांनी नगरसचिवांना सर्व विषय वाचण्याचा आदेश दिला व कोणतीही चर्चा न करता सर्व विषय मंजूर केले. याशिवाय वेळेवरील सर्व विषयसुद्धा मंजूर करण्यात आले. त्यावर शिवसेना नगरसेवकांनी आक्षेप घेतला. मात्र महापौरांनी राष्ट्रगीत सुरू करण्याचा आदेश देवून सभा संपवली.

गदारोळ पूर्वनियोजित : विजय अग्रवाल
सभागृहात गुंठेवारीसह अनेक महत्त्वाचे विषय चर्चेला येणार होते. त्यावर चर्चा टाळण्यासाठी शिवसेना व काँग्रेस नगरसेवकांनी पूर्व नियोजित गदारोळ घातला. सभेपूर्वी सकाळी या नगरसेवकांची एका आमदाराकडे बैठक झाली. तेथेच गुंठेवारीवरील विषयावर चर्चा होऊ नये याची काळजी घेण्याचे षडयंत्र रचले. सत्ताधारी व प्रशासनाला बघून घेण्याचा इशाराही देण्यात आला. प्रशासनावर या विषयात दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे आम्ही खपवून घेणार नाही. सभेत टिपणीशिवाय काही विषय मंजूर झाले. त्यामुळे ते विषय पुन्हा सभागृहापुढे चर्चेसाठी ठेवले जातील. नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांना सत्तेचा धाक दाखवून अनेक अनियमित कामे करून घेतली जात आहे. त्याची चौकशी करण्याची मागणी करणारा विषय सभागृहापुढे ठेवण्यात येणार होता. त्यामुळेच ही चर्चा टाळण्यासाठी पूर्व नियोजित गदारोळ घालण्यात आला असल्याचा आरोप माजी महापौर विजय अग्रवाल यांनी सभेनंतर पत्रकारांशी बोलताना केला.


मोबाईल कंपन्यांसोबत साटेलोटे : साजिद खान
महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे मोबाईल कंपन्यांसोबत साटेलोटे आहे. पदाधिकाऱ्यांनीच मोबाईल कंपन्यांना फायदा करून देण्याच्या उद्देशाने व त्यांना न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा करून देण्यासाठी सभेच्या विषय सूचिवर फोर जीचा विषय टाकला. प्रशासनाकडून त्याची टिप्पणी नाही. मनमानी कारभार सुरू आहे. माजी महापौरांनीच सभागृहात गदारोळ घालण्यासाठी प्रोत्साहान दिल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते साजिद खान पठाण यांनी केला.


ठराव मिळाल्यावर निर्णय घेवू : आयुक्त
सभागृहात झालेला गदारोळ हा राजकीय असल्याने त्यावर प्रशासनाने भाष्य करणे योग्य नाही. सभागृहातील विषयांसंदर्भात अंमलबजावणीबाबत इतिवृत्त व ठराव मिळाल्यानंतर योग्य तो निर्णय घेण्यात येईल. जोपर्यंत हातात ठराव येत नाही, तोपर्यंत कोणत्याच विषयावर बोलता येणार नाही, असे महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.


जनतेचे प्रश्‍न मांडले : राजेश मिश्रा
माझ्या प्रभागात येणाऱ्या रस्त्यावरील समस्या सभागृहात मांडली. त्यावर कोणताही निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला नाही. जनतेला होत असलेला त्रास बघता आणि केवळ ही समस्या एकट्या माझ्या प्रभागातील नसून, संपूर्ण शहारातच त्याचा त्रास असल्याने सभागृहाचे व प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा माझा प्रयत्न होता, असे राजेश मिश्रा यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com