शिवसेना नगरसेवकांचा पालिका वाहनतळात मुक्काम

file photo
file photo

यवतमाळ ः कचरा टाकण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी शिवसेना नगरसेवकांनी शुक्रवारी (ता.26) पालिकेच्या वाहनतळात मुक्काम केला. त्यानंतर शनिवारी (ता.27) पालिका प्रशासन अधिकाऱ्यांनी सावरगड कचरा डेपोत वाहने नेली. मात्र, नागरिकांच्या विरोधासमोर प्रशासन अधिकाऱ्यांना नमते घ्यावे लागले. परिणामी, पुन्हा सर्व वाहने पालिकेसमोर उभी करण्यात आली आहे.
शहरातील घनकचरा व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडले आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही शहरातील कचराकोंडी वाढली आहे. संकलित केलेला कचरा टाकण्यासाठी जागा नसल्याने नगरसेवकांची डोकेदुखी वाढली आहे. जागेबाबत नगरसेवकांची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. मात्र, अद्याप यावर तोडगा काढण्यात आला नाही. परिणामी, कचरा संकलनाचा मुद्दा पावसाळ्यात चांगलाच गरम झाला आहे. जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी शिवसेना नगरसेवकांनी शुक्रवारी (ता.26) संकलन वाहने परत करून पालिकेच्या वाहनतळात ठिय्या मांडला. प्रशासनाने तोडगा न काढल्याने शिवसेना नगरसेवकांनी वाहनतळातच मुक्काम ठोकला. यानंतर प्रशासनाला जाग आली. पालिका प्रशासन अधिकारी शशिमोहन नंदा यांनी शनिवारी (ता.27) शिवसेना नगरसेवकांची भेट घेतली. सावगरगड येथील कचरा डेपो येथे कचरा पाठविण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर सर्व वाहने सावरगड कचरा डेपोवर पाठविण्यात आली. वाहने येताच स्थानिकांनी वाहनांचा मार्ग रोखला. कचरा टाकण्यास विरोध केला. पालिका प्रशासन अधिकारी नंदा यांनी गावकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, चर्चा निष्फळ ठरली. गावकऱ्यांचा विरोध कायम असल्याने कचरा संकलन वाहने परत पाठविण्यात आली. जागेबाबत तोडगा न निघाल्याने शिवसेना नगरसेवकांनी सर्व वाहने पालिकेसमोर उभी केली. त्या ठिकाणीच पुन्हा ठिय्या मांडला. शहरात कचरा साचल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. तोडगा न निघाल्याने शिवसेना गटनेते गजानन इंगोले तसेच ज्येष्ठ नगरसेवक उद्धव साबळे यांनी पालिकेच्या वाहनतळात मुक्काम ठोकला आहे. आंदोलनात पिंटू बांगर, पंकज देशमुख, नीलेश बोलोकार, राजू यादव, वैशाली कन्नाके आदी सहभागी आहेत.

बसपाचा पाठिंबा
शिवसेना नगरसेवकांच्या आंदोलनाला बहुजन समाज पक्षाने पाठिंबा दिला आहे. पालिकेतील पक्षाचे गटनेते गणेश धवने यांनी तसे जाहीर केले. शिवाय ते शिवसेना नगरसेवकांसोबत आंदोलनात सहभागी झाले आहे. कचरा प्रश्‍नावर लवकर तोडगा न काढल्यास पालिका प्रशासनाची अडचण होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com