शिवसेनेचे माजी मंत्री गुलाबराव गावंडेंचा राष्ट्रवादीत प्रवेश

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

'मला विविध पक्षातून प्रवेशासाठी ऑफर होत्या. परंतु, शेतकऱ्यांशी नाळ असलेला व शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असलेला राष्ट्रवादी काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे.

नागपूर - शिवसेनेचे माजी आ.गुलाबराव गावंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ.सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. नागपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा करण्यात आली.

याप्रसंगी आमदार प्रकाश गजभिये, माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, युवक उपाध्यक्ष अजित यशवंतराव आदी मान्यवर उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गावंडे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत केले.

यावेळी बोलताना गुलाबराव गावंडे म्हणाले, ''मला विविध पक्षातून प्रवेशासाठी ऑफर होत्या. परंतु, शेतकऱ्यांशी नाळ असलेला व शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असलेला राष्ट्रवादी काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे. त्यामुळे  शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करित आहोत"

गावंडे यांनी गेल्या रविवारी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. तेव्हाच गावंडे राष्ट्रवादीत जाणार हे निश्चित झाले होते. एकेकाळी पश्चिम विदर्भातील शिवसेनेचा चेहरा म्हणून गावंडे यांची ओळख होती. युती शासनाच्या काळात ते क्रीडा राज्यमंत्री होते. त्यांनी कारंजा, बोरगांव मंजू, अकोट या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. २०१४ ची विधानसभा निवडणूक ते अकोला पश्चिम मतदारसंघातून लढले आणि पराभूत जाले. तेव्हापासून ते शिवसेनेपासून दुरावत चालले होते. शिवसेनेने त्यांना निर्णय प्रक्रियेपासून दूर ठेवल्याने त्यांचे समर्थकही नाराज होते. 

दरम्यान, जानेवारी महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत अकोला येथे जाहीर सभा आयोजित करण्यात येणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने शिवसेनेतील पदाधिकारी, कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आला आहे. या सभेतच शिवसेना सोडण्यामागची पार्श्वभूमी आपण जाहीरपणे सांगू असे गावंडे यांनी सांगितले आहे.

Web Title: Shiv sena leader Gulabrao Gawande enters NCP